पुणे : आतापर्यंत लग्नांमध्ये नवरदेवाचे बूट चोरले जातात हे आपण ऐकून आहोत. पण पुण्यामध्ये चक्क नवरदेवाच्या पित्याने स्वतःच्या मेव्हणीचे दागिने चोरलेत तेही स्वतःच्या मुलाच्या लग्नकार्यात. तब्बल अडीच लाखांचे दागिने चोरल्यानंतर अवघ्या 4 तासांत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणात दत्ता दगडू गोरे (वय 48, घुलेनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे यांच्या मुलाचा विवाह वडगाव बुद्रुक धबाडीवस्तीत होता. फिर्यादी या गोरे यांच्या मेव्हणी लागतात. त्या लग्नासाठी आल्या होत्या. त्यांचा भाऊ देखील याच परिसरात राहतो. त्या लग्नाला आल्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला जायचे होते. यामुळे त्यांनी सेफ म्हणून भावाच्या घरी हे दागिने ठेवले होते. हे सोने त्यांच्या भावाने कपाटात ठेवले होते.


सर्वजण हळदीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मात्र गोरे याने घरात शिरून कपाटातून 2 लाख 42 हजार रुपयांचे सोन्याचे चोरले. तक्रारदारांनी दागिने पाहिले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर अवघ्या 4 तासांत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.