बोईसरमध्ये राहणाऱ्या मनिष पाटील यांनी 4 मार्च 2012 रोजी जम्मूला जाण्यासाठी जेट एअरवेजच्या फ्लाईटची तीन तिकीटं बुक केली होती. एका ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून पाटील वैष्णोदेवीच्या यात्रेला जाणार होते. मनिष यांच्यासोबत पत्नी आणि मूल होतं.
विमान पकडण्यासाठी पाटील दाम्पत्य मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर पोहचलं असता सिस्टीम फेल्युअरमुळे बोर्डिंग पास देण्यास कंपनीने असमर्थता दर्शवली. मात्र काही वेळाने त्यांना वेगळंच कारण पुढे करण्यात आलं. तिकीटं कन्फर्म असली तरी विमान ओव्हरबुक असल्याचं सांगत फ्लाईटमध्ये चढता येणार नसल्याचं पाटील दाम्पत्याला जेटकडून सांगितलं गेलं.
दिल्लीमार्गे जाण्यासाठी जेट एअरवेजकडून पर्यायी विमान सुचवण्यात आलं. मात्र जम्मूला जाण्यासाठी पुढील कनेक्टिंग फ्लाईटचं कन्फर्मेशन देण्यात आलं नाही, असं मनिष पाटील यांनी ग्राहक मंचाकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
जेट एअरवेजकडून झालेल्या असहकारामुळे पाटील दाम्पत्याला आपली ट्रीप रद्द करावी लागली. जम्मूमधील हॉटेल वास्तव्य, स्थानिक प्रवासासाठी लोकल कारचं बुकिंग, कट्रा ते जम्मू मार्गावरील हेलिकॉप्टरचं बुकिंग असा सर्व प्रवास नियोजित होता.
केवळ जेट एअरवेजचा विमान प्रवास रद्द करावा लागल्यामुळे संपूर्ण ट्रीप कॅन्सल करण्याची वेळ आली. त्यामुळे मनस्ताप आणि आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार पाटील यांनी मंचाकडे केली. जेटने मात्र आपण दिलेली पर्यायी फ्लाईट आणि प्रत्येकी चार हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची ऑफर तक्रारदाराने नाकारल्याचा बचाव केला.
अनेक वेळा प्रवासी फ्लाईट बूक करतात, मात्र ऐनवेळी येत नाहीत, त्यामुळे कंपनीचं नुकसान होतं. हे टाळण्यासाठी हवाई कंपन्या ओव्हरबुकिंग करतात, त्यामुळे प्रवाशांचं नुकसान होत असल्याचं निरीक्षण ग्राहक मंचाने नोंदवलं. मात्र पर्यायी फ्लाईटमुळे उशीर होणं, प्रवाशांनी ठरवलेल्या कार्यक्रमात बदल करावे लागणं अशाप्रकारे प्रवाशांनाच फटका बसत असल्याचंही ग्राहक मंचाने सांगितलं.
तक्रारदाराने सादर केलेली बिलं पाहून त्यांना सव्वा लाखाचं नुकसान झाल्याचं ग्राहक मंचाने स्पष्ट केलं. पुढील दोन महिन्यात सव्वा लाखांच्या रकमेसह कायदेशीर प्रक्रियांना लागलेले 35 हजार रुपये देण्याचे आदेश जेट एअरवेजला देण्यात आले आहेत.