रत्नागिरी : रत्नागिरीच्या समुद्रकिनारी निसर्गाने काढलेली एक अनोखी आकर्षक रांगोळी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. रत्नागिरीतील बहुतेक सगळ्याच किनाऱ्यांवर ही रांगोळी पाहायला मिळते आहे. तुम्ही या रांगोळीला हात लावलंत, तर ते धोकादायक ठरू शकतं. कारण रांगोळी आहे जेली फिशची.
रत्नागिरीतील वेगवेगळ्या समुद्रकिनारी लाखोंच्या संख्येने जेली फिश येऊन विसावले आहेत. बटनासारख्या आकाराचे आणि निळ्या रंगांचे असल्याने या जेली फिशना ‘ब्ल्यू बटन जेली फिश’ असंही म्हटलं जातं. याचं शास्त्रीय नाव `पॉप्रिटा पॉप्रिटा`असं आहे.
पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्ण आणि समशीतोष्ण पाण्यामध्ये आढळतो आणि समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगतो. समुद्रातील प्रवाह आणि वारे यावरच त्याचा प्रवास अवलंबून असतो. हा हायड्रोईड अत्यंत रोचक असा जीव आहे. त्याचे बटनासारखे युनिट अनेक झूईड्सने बनलेले असते, तर त्याच्या भोवती असंख्य निळ्या गडद नलिकांचा टेन्टॅक्लेकचा संच असतो. अन्न साखळीमध्ये हा जीव सागरी पृष्ठभागावर महत्वाची भूमिका बजावत असतो. जेली फिश पाहता आपल्याला त्यांना हात लावायचा मोह होतो, पण तो टाळावा कारण त्यांना हात लावताच तुमचा शरीराचा तो भाग लाल होतो आणि त्याची जळजळ होते.
सध्या रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने ही जेली फिश येऊन पडल्याने किनाऱ्यावरती रांगोळी काढल्याचा भास होतो. भाट्ये प्रमाणेच आरेवारे आणि अन्य किनाऱ्यावरही जेली फिश पाहायला मिळत आहेत. मात्र, त्याला आपण स्पर्श केल्यास स्पर्श केलेला आपल्या शरीराचा भाग लालसर होऊन तिथे जळजळ होते. रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर आलेल्या या जेलीफिशना पाहायला अनेक जण आवर्जून किनाऱ्यावर जात आहेत.