मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते होते त्यावेळी आपण त्यांना अध्यक्ष व्हा असं सांगितलं होतं, त्यावेळी त्यांनी नकार दिला होता असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं. आपल्याला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना अध्यक्ष करण्यासाठी बैठकही बोलावली होती, परंतु त्याच आधी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असा गौप्यस्फोटही जयंत पाटलांनी केला.
अजित पवारांचा अध्यक्ष व्हायला नकार
जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार विरोधी पक्षनेते झाले त्याचवेळी त्यांना मी बोललो होतो की तुम्ही अध्यक्ष व्हा, मी विरोधी पक्षनेता होतो. मात्र त्यांनी सांगितलं की माझा चॉईस हा विरोधी पक्षनेता आहे. अध्यक्षपदामध्ये रस नाही. ते मला बोलले असते तर मी स्वतः षण्मुखानंद येथे जाहीर केलं असतं मी 5 वर्ष पूर्ण केली आहेत अजित पवार यांना अध्यक्ष करा.
षण्मुखानंद येथील सभेनंतर शरद पवार यांनी मला फोन केला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं अजित पवार याना अध्यक्ष करा, मी 5 वर्ष पूर्ण केली आहेत. मी त्यानंतर स्वतः भेटून सांगितलं त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार याना अध्यक्ष करण्यासाठी बैठक देखील बोलावली. परंतु त्याच आधी 2 जुलैला ही घटना घडली. त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला.
पक्ष फुटू नये म्हणून मी काम करत होतो, आता जे होईल ते होईल
मी पक्षाचा अध्यक्ष होतो, या पक्षाचे तुकडे झाली तर समाजाचे मोठं नुकसान होईल. मी नैतिकतेच्या आधारावर निर्णय घेतला. आमच्या इतर सहकाऱ्यांनी काही कारणास्तव निर्णय घेतला. मी पक्षात जे झालं हे मिटावं म्हणून मी काम करत होतो. त्याबाबत मी प्रफुल पटेल, अजित पवार यांच्यासोबत देखील बैठका देखील केल्या. परंतु आता त्यांनी निर्णय घेतला आहे. आता पुढं जे होईल ते होईल
2019 मध्ये सगळे पक्ष सोडून चालले होते. मात्र मी भाषणात म्हणालो होतो की, आपल्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यावेळी आपण 54 आमदार निवडून आणले. आपला पक्ष मोठा करायचा असेल तर त्यासाठी लोकांपर्यंत पोहचायला हवं आणि त्यासाठी परिवार संवाद यात्रा काढली होती. आमचा पक्ष एक असता तर आपली एक हाती सत्ता आणली असती. 2024 साली आपला पक्ष मोठा झाला पाहिजे असं स्वप्न होतं.
शरद पवारांसमोर इतरांची उंची किती?
काँग्रेस मधून बाहेर पडलो त्यावेळी शरद पवार यांच्याकडे पाहून आम्ही निर्णय घेतला होता. आता देखील ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी मला अध्यक्ष असलो तरी काहीही कल्पना मला नव्हती, त्यामुळे डोळ्यात अश्रू उभे राहिले. आम्ही शरद पवार यांचा पक्ष म्हणून आम्ही यात आलो होतो. त्यापुढे इतरांची उंची किती आहे?
राममंदिर कार्यक्रम होतोय आता असं बोललं जात आहे. भाजप सत्तेत आल्यावर सर्वांना अयोध्या दौऱ्यावर घेऊन जाईल असं भाजप सांगत आहे. आगामी निवडणूक धार्मिकतेच्या मार्गावर घेऊन जात आहेत. रस्ता करून देतो म्हणालं की लोक जास्त मतं देतात, रस्ता तयार झाल्यावर तेवढी मतं मिळत नाही. राम मंदिर मुद्दा मी अशा प्रकारे पाहत आहे. आताच्या काळात मुख्य मुद्याला बाजूला करण्यासाठी असं काहीतरी केलं जातं.
पीएमओकडून फाईल येते आणि मंत्र्यांना सही करावी लागते
यापूर्वी काँग्रेस सरकार, एनडीए सरकार असं म्हटलं जायचं. परंतु मोदी सत्तेवर आले आणि त्यानंतर मोदी सरकार असंच नामकरण झालं, किंबहुना करण्यात आलं. यातील आणखी एक बाब म्हणजे पीएमओकडून फाईल येते आणि त्यावर मंत्र्यांना सही करावी लागते. अगोदर कोण कोणत्या खात्याचे मंत्री हे कळायचं. आता ते देखील कळत नाही. फक्त नितीन गडकरी हेच नाव ऐकू येतं, कारण ते बोलत तरी असतात.
शिवसेना ऐकत नाही म्हणून त्यांच्यात फूट पाडण्यात आली. भाजपच्या जवळ जे लोक गेले त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणण्यात आलं. 2024 साली मोदी एकहाती सत्ता घेऊन आले तर त्यांना छोट्या पक्षांची गरज राहणार नाही. त्यांच्या वळचणीला गेलेल्या पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. अनेक मित्र पक्ष भाजपची साथ सोडत आहे उदाहरण अकाली दल. त्यांच्या लक्षत येऊ लागलं आहे की आता आपलं अस्तित्व संपायला लागलं आहे.
ही बातमी वाचा: