Chhatrapati Sambhajinagar: तीन वर्षांपासून प्रस्तावित असणाऱ्या तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी (Flowting solar panel Project) महाराष्ट्रातील चार अभयारण्यांपैकी असणाऱ्या जायकवाडी पक्षी अभयारण्याचा (Jayakwadi Bird Century) दर्जा रद्द करण्याचा घाट भाजप खासदार व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी घातला आहे. आशियातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या पैठणच्या जायकवाडी धरणात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जायकवाडी पक्षी अभयारण्याचा इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा रद्द करण्याची मागणी खासदार भागवत कराड यांनी वन विभागाकडे केली आहे.


राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी दोन वेळेस केली असल्याचे देखील समोर आले आहे. महाराष्ट्रातील चार अभयारण्यापैकी असलेले जायकवाडीचे हे अभयारण्य आहे. आधीच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मोठा विरोध होत असताना केलेल्या या मागणीमुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले खासदार भागवत कराड?


जायकवाडीवर तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. ७० हजार एकरवर पसरलेले हे धरण आहे. आपला तरंगत्या सौरऊर्जेचा हा साडेसात हजार एकरवरचा प्रकल्प आहे. यातील केवळ एक दशांश जागेवरती हा प्रकल्प उभा राहणार असून पक्ष्याला यातून कोणताही त्रास नाही. उलट प्रकल्पाच्या सावलीत पक्ष्याला बसायला जागा होईल, पाणी पिऊन ते प्रकल्पाच्या सावलीत बसतील. तिथे कोणताही आवाज नाही. पक्ष्याच्या रक्षणासाठी हा तरंगता सौरप्रकल्प महत्वाचा राहणार असल्याचे छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत ते म्हणाले.


मच्छीमारांनी केले होते आंदोलन


जायकवाडीवर प्रस्तावित असणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध असून यासाठी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात जलसमाधी आंदोलन केले होते. पैठणच्या नाथसागरात उतरत सरकारने या प्रकल्पासाठी सुरु केलेला सर्वे थांबवावा यासाठी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमधील हजारो मच्छीमारांनी विरोध दर्शवला होता. या प्रकल्पामुळे मच्छीमारांची उपजिवीका धोक्यात येणार असून हजारो मच्छीमारांवर उपासमारीचे संकट ओढावणार असल्याचा त्यांचा दावा आहे.


तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाबाबत घेतली होती  मुंबईत बैठक


भाजपचे खासदार भागवत कराड यांच्या जायकवाडी तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाबाबत २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतली होती. या प्रकल्पासाठी योग्य ती चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या होत्या. यावेळी महावितरण सोबतच महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता.


हेही वाचा:


Dam Water Storage Marathwada: मराठवाड्यातील धरणांना पाण्याची प्रतीक्षाच! जायकवाडीसह उर्वरित धरणांमध्ये पाणीसाठा किती?