मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकांना घरात राहण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केलं होतं. यामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सायंकाळी पाच वाजता घराच्या बाहेर येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. याला देशभरात उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. अगदी राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांनी यात भाग घेत आपल्या झटण्यासाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मात्र, काही ठिकाणी लोकांनी एकत्र येत ही कृती केल्याने नियमाचे उल्लघन झाल्याचेही पाहायला मिळाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सायंकाळी 5 वाजता सर्व भारतीयांनी टाळी वाजवून थाळीनाद करून डॉक्टर; आरोग्य सेवकांचे जाहीर आभार मानले आहेत. या उपक्रमामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही घराच्या बाहेर येत कुटुंबासोबत टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंदर सुळे आणि त्यांची मुलेही होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींनी देखील घराच्या बाहेर येत थाळीनाद केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मातोश्री बाहेर येऊन पत्नी मुलगा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि कुटुंबातील सदस्यांसोबत टाळ्या वाजवून या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.


Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची


एकत्र येऊन घंटानाद करणं अपेक्षित नाही
कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार! जनतेनं आपल्या घरातून घंटानाद, थाळीनाद केले त्याबद्दल त्यांचेही आभार परंतु लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन हा घंटानाद करणं अपेक्षित नाही, अशा शब्दात आपली नाराजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिध्दी देणं टाळण्याची गरज आहे असे सांगतानाच कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं, असं आवाहन अजित पवार यांनी सोशल मीडियावर केले आहे.


#Coronavirus | महाराष्ट्र लॉकडाऊन! संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू : मुख्यमंत्री


सातपुड्यातील आदीवासीही सहभागी
आज कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण भारतात अभूतपूर्व असा जनता कर्फ्यू पाळला गेला आणि या कोरोनाच्या संकटाशी प्रत्यक्ष जे लढतायत अशा डॉकटर नर्सेस सर्व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी शासकीय कर्मचारी पोलीस विभाग अश्या सर्वांप्रती कृतज्ञता म्हणून सायंकाळी पाच वाजता आपल्या घराच्या दारात उभे राहून त्यांना सलाम केला. सातपुड्यातील लोक संघर्ष मोर्चाचे आदिवासी बांधवही यात मागे नव्हते. जळगांव तसेच नंदूरबार जिल्ह्यातील संघटनेच्या गावागावात कुठलीही गर्दी न करता आपल्याच दारात उभे राहून या आदिवासींनी या लढ्यात ही सहभागी असल्याचे दाखवून दिले.


केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही मानले आभार
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील प्रशासन, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानून टाळ्या वाजवून थाळीनाद करत कृतज्ञता व्यक्त केली. जालन्यातील भोकरदन येथे त्यांच्या निवास्थानी सहकुटुंब त्यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे देखील त्यांच्या सोबत होते. संपूर्ण दानवे कुटुंबीयांनी घरासमोर येऊन थाळी वाजवून आपल्या या भावना व्यक्त केल्या. तर, जालना येथे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सहपरिवार कृतज्ञता व्यक्त करत टाळ्या वाजवत थाळी आणि घनटनांद केला. खोतकारांच्या 'दर्शना' निवस्थानी खोतकारांचे संपूर्ण कुटुंब पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर, प्रशासन, मीडिया, पोलीस यांचे जनता कर्फ्यू दरम्यान आभार मानण्यासाठी एकत्र आले. त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत हा थाळी आणि घनटनांद केला.


Janta Curfew | शुकशुकाट...! मुंबईसह महाराष्ट्रातील काही ठिकाणांची अशी दृश्यं, जी तुम्ही कधीच अनुभवली नसतील


माजी मंत्री गिरीश महाजन यांचा सहकुटुंब घंटानाद
जनता कर्फ्यूच्या पूर्व संध्येला लोकप्रतिनिधींनीही उस्पूर्त प्रतिसाद देत घराबाहेर येवून घंटानाद, थाळीनाद केला. यात राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही आपल्या कुटुंबासमवेत जामनेर येथील निवास स्थानी थाळीनाद व घंटा करून कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे योगदान देत आहेत त्यांचे आभार मानले. तर, जनता कर्फ्यूच्या पूर्व संध्येला आज जळगावकरांनी उस्पूर्त प्रतिसाद देत घराबाहेर येवून घंटानाद थाळी नाद केला. यात राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ही आपल्या नातवंडाबरोबर थाळी नाद व घंटा नाद केला.
ग्रामीण भागातही टाळ्या, घंटा आणि शंखाचा गजर
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या व्यक्तींसाठी देशवासीयांनी संध्याकाळी पाच वाजता टाळ्या वाजवून, शंख वाजवत, घंटानाद केला. कोरोनाचा बीमोड करण्यासाठी सतत लढणाऱ्या अत्यावश्यक सेवांमधील व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्याला देशवासीयांनी जोरदार प्रतिसाद दिला. मेट्रो सिटी, शहरं, गावांमध्ये लोकांनी आपल्या घरांमध्ये, गॅलरी-बाल्कनीत, सज्जांमध्ये उभं राहून टाळ्या वाजवल्या. काहींनी शंखनाद केला. काहींनी थाळ्या वाजवत कृतज्ञता व्यक्त केली. यात ग्रामीण भागातील जनतेनेही उत्स्फुर्त सहभाग घेतला.


Janata Curfew | टाळी नाद, थाळी नाद; जनता कर्फ्यूबाबत गिरगावकरांच्या प्रतिक्रीया | ABP Majha