मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला जनता कर्फ्यु देशासह राज्यभरात तंतोतंत पाळला गेला. हा जनता कर्फ्यु उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत कायम ठेवला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच 5 पर्यंत कर्फ्युनंतर 31 मार्चपर्यंत जमावबंदी आदेश असल्याचे त्यांनी सांगितलं.  राज्यभरात एकूण 74 बाधित रुग्ण असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तसेच गोवा आणि इतर राज्याच्या बॉर्डर सील करण्याबाबत कारवाई सुरू आहे. गोवा आणि इतर राज्यातून ज्या बॉर्डर लागून आहेत. ज्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्या बॉर्डर सील करण्याबाबत कारवाई सुरू आहे, असंही ते म्हणाले.


रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका. मीच माझा रक्षक हा संदेश सर्वांना पाळावा, असंही राजेश टोपे म्हणाले. लोकांनी घाबरुन जाऊ नये, जीवनावश्यक गोष्टींचा साठा घरात करू नये. लहान मुलांसह घरातील वयोवृद्धांची काळजी घ्या, असं देखील राजेश टोपे म्हणाले.

त्यांनी सांगितलं की राज्यात 144 कलम लागू करण्यात येत आहे. रेल्वे , खाजगी आणि एस. टी. बसेस बंद करण्यात येत आहेत, लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरुच राहतील.  ते म्हणाले की, वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील. तसेच शासकीय कार्यालयात आता 25 टक्के उपस्थिती होती. ती आता केवळ 5 टक्के करण्यात येत आहे.

आजपर्यंत महाराष्ट्रात परदेशातून नागरिक, आपले कुटुंबिय आले आहेत. आता विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कुणी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आपल्याला संकटावर मात करण्याची, प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्याची चांगली संधी आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही, त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे. परंतू परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, त्यांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबियांपासूनही स्वत:ला दूर करण्याची गरज आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये. किमान 15 दिवस बाहेर जाऊ नये, आपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.