Jalna IT Raid : जालना, औरंगाबादमधील आयकर खात्याच्या (Maharashtra Jalna aurangabad IT Raid) कारवाईची राज्यासह देशभरात चर्चा सुरु आहे. जालन्यातील स्टील कंपन्या, डिलर्स आणि अन्य व्यावसायिकांवर (Jalna Marathwada steel company Raid) टाकलेल्या छाप्यात आयकर खात्याच्या हाती तब्बल 390 कोटींचं घबाड लागलं आहे. या कारवाईतील नवनवी माहिती आता समोर येतेय. 58 कोटींची रोकड, 32 किलो सोनं असं सगळं सापडत असताना याची माहिती जालन्यातल्या लोकांना लागली नाही. तब्बल आठ दिवस ही कारवाई सुरु होती आणि आयकर विभागानं कारवाई गुप्त ठेवण्यासाठी लगीनघाईचं चित्रं उभं केलं होतं. त्यासाठी कारवर 'राहुल वेड्स अंजली'चे स्टिकर्स लावले होते. ही कारवाई इतकी मोठी होती की 10 ते 12 मशिनच्या सहाय्यानं तब्बल १३ तास रोकड मोजण्यासाठी लागले. तर मालमत्तेची मोजदाद करताना आयकरचे काही अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडले. 


जालन्यातील स्टील उद्योग किती मोठा?


जालन्यात लोखंडी सळ्या निर्मितीचे 14 मोठे आणि 22 लहान कारखाने


कारखान्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा एकूण 20 हजार जणांना रोजगार


जालन्यातून  कोट्यवधी रुपयांचा प्राप्तिकर आणि जीएसटीचा वाटा


स्टील कारखान्यांतून दर महिना वीज वितरण कंपनीला १०० ते १५० कोटींचा वीजबिल भरणा


स्टील उद्योगातून महिन्याकाठी हजारो टन उत्पादन, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात मागणी


या उद्योजकांवर कारवाई


आयकर खात्यानं कुणावर छापे टाकले त्यांची नावं समोर आली आहेत. आयकर खात्याच्या पथकांनी जालन्यातील  व्यावसायिक, डिलर आणि एका सहकारी बँकेवर छापे टाकले. त्यात जालन्यातील एसआरजे स्टील कंपनी, कालिका स्टील कंपनीमध्ये छापे टाकण्यात आले. खासगी फायनान्सर विमलराज सिंघवी आणि डिलर प्रदीप बोरा यांच्या व्यापारी प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. या छाप्यात कुणाकडे किती संपत्ती सापडली याबाबत आयकर विभाग प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्याची शक्यता आहे. तूर्त कारवाई झालेल्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.


जीएसटी अधिकाऱ्यांच्या माहितीनंतरच आयकर खात्याची कारवाई


जालन्यात आयकरच्या छाप्यात 390 कोटींचं घबाड सापडल्यानंतर या कारवाईबाबत नवी मिळतेय. राज्य आणि केंद्राच्या जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतरच आयकर खात्यानं ही कारवाई केली अशी माहिती मिळाली आहे. स्टील कारखाने आणि भंगार डिलर यांनी जीएसटीचं बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याची माहिती जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी आयकर खात्याला दिली. त्यानंतर आयकर खात्यानं जालना आणि औरंगाबादमधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आणि ही कारवाई अजूनही सुरुच आहे, असं आयकरमधील सूत्रांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


गाड्यांवर 'राहुल weds अंजली'चे बोर्ड; इनकम टॅक्सचं वऱ्हाड करचुकव्यांच्या घरात, जालन्यातील धाडीमागची फिल्मीस्टाईल कहाणी


Jalna : जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त, तब्बल 13 तास मोजली रक्कम