Jalna News: उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील (Uttarakhand Landslide) केदारनाथ धाम ट्रेकींग मार्गावर दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. यात मृत भाविकांमध्ये जालना (Jalna) जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणाचा समावेश असून जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


उत्तराखंड येथील गौरीकुंड केदारनाथ ट्रेकींग मार्गावर चिरबासा परिसराजवळ सकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला आहे.  जेंव्हा भाविकांना डोंगरावरून खाली पडणाऱ्या दगडांचा आणि ढिगाऱ्याचा फटका बसला.  या अपघातात महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश असून सुनील महादेव काळे या जालना जिल्ह्यातील तरुणाचा समावेश असून दुसरा तरुण नागपूर जिल्ह्यातील असल्याचं समजतंय.


जालन्यातील तरुणासोबत ९ व्यक्ती गेले होते दर्शनाला


जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी येथील सुनील महादेव काळे या २४ वर्षांच्या तरुणाचा समावेश असून त्याच्यासोबत गोंदी येथील परमेश्वर चव्हाण यांच्यासह ९ व्यक्ती केदारनाथ येथे  दर्शनासाठी गेले होते. जिल्हा प्रशासन त्यांच्यासह मंत्रालय नियंत्रण कक्ष आणि रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.


उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त


एसडीआरएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत तीन भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर इतर आठ जण जखमी अवस्थेत बचावले आहेत.  त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या संदर्भात मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना चांगले उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ."


जखमी आणि जीवितहानी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जिल्हा प्रशासन प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे सतत आवाहन करत आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील बिशनपूर जवळील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गासह, आदल्या दिवशी बंद करण्यात आलेल्या अनेक प्रमुख महामार्गांवर भूस्खलन झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राजवार यांच्या म्हणण्यानुसार ढिगाऱ्यातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका जखमी व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे.