Palghar Crime News पालघर : भाजीपाल्याच्या गाडीच्या आड गांजाची (Ganja) तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात जव्हार पोलिसांना (Jawhar Police) यश आले आहे. या कारवाईत गांजा आणि महिंद्रा पिकअप गाडीसह सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामुळे गांजा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.  


याबाबत अधिक माहिती अशी की, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीमध्ये गांजाची तस्करी सुरु असल्याची गुप्त माहिती जव्हार पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डहाणू जव्हार रोडवरील डहाणू नाका (Dahanu Naka) येथे सापळा रचला. 


आठ लाखांचा गांजा जप्त 


डहाणू नाका येथे जव्हार पोलिसांनी भाजीपाल्याच्या गाडीच्या आड गांजाची तस्करी करणाऱ्यांना तीन जणांना ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये जवळपास आठ लाखाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि महिंद्रा पिकअपसह सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 


नाशकात ऑनलाईन बुक केलेल्या गाडीत सापडला लाखोंचा गांजा


दरम्यान, नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी ऑनलाईन (Online) बुक केलेल्या गाडीत लाखोंचा गांजा आढळून आला होता. भारत नगर परिसरात मुंबई नाका पोलीस पेट्रोलिंग करत असताना एक चार चाकी वाहन संशयास्पद आढळून आले. त्यानंतर या वाहनाची झाडाझडती घेतली असता 19.65 किलो गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी कारचालक किरण धुमाळ याला ताब्यात घेतले असून कारचालकाने गाडीत एक महिला अनेक पुरुष पुण्याहून नाशिककडे गाडी ऑनलाईन बुकिंग करून आले होते आणि हे सर्व पार्सल त्यांचे असून ते दोघे भारत नगर चौफुलीवर मला थांबवून पार्सल घेण्यासाठी येईल त्याला देण्याचे सांगून निघून गेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.