जालना : जालना जिल्ह्यातील मंठा इथल्या नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिली. या संबंधात अनिल देशमुख यांनी ट्वीट केलं आहे.


वैष्णवी गोरे नावाच्या नवविवाहितेची 30 जून रोजी हत्या झाली होती. वैष्णवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आरोपीने भर बाजारात चाकूने गळा कापून तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर मंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीची गळा चिरुन हत्या; आरोपीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न


राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कालच (3 जुलै) पीडित कुटुंबाची भेट घेऊन "हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी," अशी मागणी केली होती. त्यानंतर "संबंधित घटना निंदनीय आहे. ही केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवली जाईल आणि गोरे कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल," असं ट्वीट गृहमंत्र्यांनी केलं.






काय आहे प्रकरण?
वैष्णवी गोरे नावाच्या 19 वर्षीय तरुणीचा 26 जून रोजी जालन्यातील तरुणासोबत विवाह झाला होता. मांडव परतणीसाठी ही तरुणी 28 जून रोजी माहेरी आली होती. तर 30 जून रोजी ही तरुणी आई आणि मैत्रिणीसोबत खरेदीसाठी बाजारात गेली होती. मात्र काही वेळाने आई परत घरी गेली. हिच संधी साधत आरोपीने तरुणीची हत्या केली. शेख अल्ताफ शेख बाबू असं 26 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याचं या तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. परंतु तिचं लग्न झाल्याच्या रागातून आरोपीने तिची हत्या केली. त्यानंतर अटकेच्या भीतीने त्याने विष प्राशन केलं होतं. त्याची प्रकृती स्थिर असून पोलिसांच्या ताब्यात आहे.