शिर्डी : कोरोनाच्या सावटामुळे शिर्डी साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव साजरा होणार आहे. आज 4 जुलै ते 6 जुलै असा तीन दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. मात्र तो अगदी साध्या पद्धतीने केवळ धार्मिक विधी या दरम्यान पार पडणार आहेत. रथ यात्रा तसेच पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. पायी पालख्या घेऊन येणाऱ्या भाविकांना देखील पालख्या न आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


कोरोनाच्या संकटामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा बघता अगोदर नोंदणी करून रक्तदान करावे, तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा असं आवाहन देखील साई संस्थानने केलं आहे. दरवर्षी साईबाबांना गुरू स्वरूप मानत लाखो भाविक साई दरबारी साईदर्शनाला हजेरी लावत असतात. मात्र यंदा घरी राहूनच आपल्या गुरूला वंदन करावे लागणार आहे.

साईबाबांच्या भक्तांसाठी गुरुपोर्णिमा उत्सवाला मोठे महत्व आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील साईभक्त या दिवशी साईंच्या चरणी लीन होतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास 4 ते 5 लाख भाविक हजेरी लावत असतात. परंपरेप्रमाणे  साईबाबांच्या काकड आरतीनंतर उत्सवाला प्रारंभ होतो आणि मंदिरातून पोथी आणि फोटोची मिरवणूक काढण्यात येते. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे भक्तांना साईबाबाचं दर्शन घेता येणार नाही. भक्तांविनाच हा उत्सव यंदा साजरा होतोय.

उद्या, रविवारी गुरुपौर्णिमा आहे. आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. परंपरेप्रमाणे या दिवशी आपल्या गुरूंची पुजा केली जाते. गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केली जाते.