जालना : शिवसेनेचे नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलिस आणि प्रशासनानं सुरु केली आहे. अतिप्रचंड प्रमाणात तूर विक्री नाफेड किंवा बाजार समितीच्या केंद्रांवर केल्यामुळे त्यांची चौकशी करण्याचे आदेश सरकारनं दिले होते.
तूर खरेदी घोटाळ्यातील आजवरचा सर्वात मोठा पर्दाफाश होत आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एकाच दिवशी 187 क्विंटल तूर विकली असून दोन दिवसात 19 लाख रुपयांची तूर विक्री केल्याची धक्कादायक माहिती 'एबीपी माझा'कडे आहे.
शिवसेना नेते असलेले अर्जुन खोतकर वस्त्रोद्योग आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्योद्योग विभागाचे राज्यमंत्री आहेत. खोतकर यांच्या नावे नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर 187 क्विंटल तूर विकली गेली. 14 फेब्रवारी 2017 या एकाच दिवशी 93.50 आणि 93.50 क्विंटल विकली गेल्याची नोंद आहे. जालना जिल्ह्यातील हिसवन या गावात तूर पिकवल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं आहे.
खोतकरांचा भाऊ संजय खोतकर यांची पत्नी योगिता खोतकर यांच्या नावे 50-50 क्विंटल अशी एकूण 100 क्विंटल तूर विकली गेल्याची माहिती आहे. पुन्हा 18 फेब्रुवारीला संजय खोतकरांनी 45-45 क्विंटल अशी एकूण 90 क्विंटल तूर विकल्याची नोंद आहे. संजय आणि योगिता यांनी गाडेसावर गाव येथे तूर पिकवल्याचा उल्लेख आहे.
एकूण 377 क्विंटल तूर विकल्याचा आरोप खोतकर कुटुंबावर आहे. खोतकर कुटुंबीयांच्या नावे एकूण 19 लाख 3 हजार 850 रुपयांची तूर विकली गेल्याची माहिती आहे. मात्र आपली 400 एकर जमिन असल्यामुळे 377 क्विंटल तूर विकल्याचा दावा अर्जुन खोतकर यांनी केला आहे.