अकोला : येत्या खरीप हंगामासाठी 'महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ' अर्थात 'महाबीज'ने चांगलीच कंबर कसली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात 'महाबीज' आपले तब्बल ६ लाख ५९ हजार क्विंटल बियाणे बाजारात आणणार आहे. यामध्ये सर्वाधिक ५.०९ लाख क्विंटलचा वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा राहणार आहे.
खरीपासाठी 'महाबीज'ची तयारी पूर्ण झाली असून, 'महाबीज'चं ६० टक्के बियाणं सध्या बाजारात आलं आहे. यावर्षी 'महाबीज' ६ लाख ५९ हजार क्विंटल बियाणं बाजारात आणणार आहे. मागच्या वर्षी हाच आकडा ५.११ लाख क्विंटल इतका होता. यावर्षीही 'महाबीज' बियाण्यांमध्ये सर्वाधिक वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा राहणार आहे. सोयाबीन बियाण्याचा वाटा यामध्ये ५ लाख ९ हजार क्विंटल एवढा असणार आहे. 'महाबीज'च्या 'जे.एस.-३३५', जे.एस.९३०५' आणि एम.ए.यू.एस.७१' या सोयाबीन वाणांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते. यासोबतच भात, तूर, मुग, उडीद, भुईमुग, ढेंचा, ताग या पिकांच्या बियाण्यांचाही यामध्ये समावेश आहे. 'महाबीज'चे खरीपासाठी बियाणे विक्री नियोजन

बियाणे

विक्रीसाठी उपलब्ध (क्विंटलमध्ये)

1). सोयाबीन

५.०९ लाख क्विंटल

2). तूर

१८,४२१ क्विंटल

3). मुग

५,६६० क्विंटल

4). उडीद

१६,५३० क्विंटल

5). सुधारित कपाशी

८८३ क्विंटल

6). देशी कपाशी

२७० क्विंटल

7). धान

८५,११० क्विंटल

दरवर्षी 'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात होत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 'महाबीज'ने विशेष खबरदारी घेतली आहे. दरम्यान, यावर्षी त्रिस्तरीय प्रमाणीकरणानंतर उगवण क्षमता तपासण्यासाठी सोयाबीन बियाण्यांची शेतचाचणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. मात्र, ७० ते ८० टक्के पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा, असा सल्ला 'महाबीज'नं शेतकऱ्यांना दिला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सोयाबीनचं बियाणं कमी पडू देणार नसल्याचा विश्वासही 'महाबीज'नं शेतकऱ्यांना दिला आहे.