औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने याचे पडसाद आता राज्यभरात पाहायला मिळत आहेत. तर या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात उद्या (04 सप्टेंबर) बंदची हाक देण्यात आली आहे. ज्यात औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात हा बंद पाळला जाणार आहे. जालना येथील घटनेनंतर शनिवारी सकल मराठा समाजाची आणि मराठा क्रांती मोर्च्याची एक बैठक झाली. या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. 


जालना येथील घटनेचे औरंगाबाद जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. तर काही ठिकाणी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर टायर पेटवून देऊन जालना येथील घटनेचा निषेध केला. दरम्यान या सर्व घटनेनंतर शनिवारी सकल मराठा समाजाची एक बैठक झाली. या बैठकीत पुढील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. दरम्यान सर्वांच्या मते सोमवारी जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


पहिला मोर्चा औरंगाबादेत निघाला होता... 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात 57 मोर्चे निघाले. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्च्याची जगाने दखल घेतली. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 'एक मराठा लाख मराठा'ची घोषणा देऊन पहिला मोर्चा औरंगाबाद शहरात निघाला होता. यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर निघाला होता. मराठा आरक्षणाच्या लढ्यात औरंगाबाद जिल्ह्याचं महत्वाचं योगदान आहे. त्यामुळे जालना येथील घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद जिल्हा उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


पोलिसांकडून मोठा बंदोबस्त...


जालना येथील घटनेनंतर औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलीस आधीच अलर्टवर आहेत. त्यातच जालना आणि औरंगाबादच्या सीमेवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, उद्या औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली असल्याने पोलिसांनी या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्याचा नियोजन केल्याची माहिती मिळत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच सर्वच महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच पोलिसांचा सर्वच भागात पेट्रोलिंग सुरु राहणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna Protest : शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड,अधिकारी थोडक्यात बचावले