जालना : जालना येथे काल झालेल्या (Jalna Maratha Reservation Protest) हिंसाचाराच्या घटनेनंतर अजूनही परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी गेलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शरद पवार जाणार असल्याने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा एक पथक त्यांच्या ताफ्यात बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र यावेळी काही अज्ञात लोकांनी डीवायएसपी सिध्देश्वर भोरे यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केली. तसेच गाडीला लाथा मारून नासधूस करण्याचा प्रयत्न केला. वाढत जमाव पाहता पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत होतं. दरम्यान शुक्रवारी आंदोलन आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पुढे दगडफेक आणि लाठीचार्ज झाला. यात अनेक पोलीस आणि गावकरी जखमी झाले आहेत. तर आज सकाळपासून या गावात अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आंदोलना स्थळी जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. शरद पवार जालन्याला जाणार असल्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा पवारांच्या ताफ्यात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र अंतरवाली सराटी गावात जाताच पोलिसांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक सुरू केली. 


अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील डीवायएसपिंच्या गाडीचं नुकसान झालं आहे. त्यांच्या गाडीच्या मागच्या काचा फोडण्यात आले आहे. यावेळी सोबत पाचोड पोलिसांचा एक पथक देखील होतो. जमावाचा रेटा वाढल्याने पोलिसांनी एक पाऊल मागे घेत घटनास्थळावरून काढता पाय घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एकंदरीत अजूनही आंदोलना स्थळी पोलिसांबद्दल गावकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे पोलिसांकडून कायदा हातात न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मुंबईच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीमार: पवार


जालना येथे घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न रहाता इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्चर्य वाटेल असा बळाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. स्त्रिया लहान मुले यांना सुद्धा पाहिले नाही. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठीहल्ला केला. हवेत गोळीबार करून ज्वारीच्या साईजचे छरे जखमींना लागले होते. तर मुंबईहून आलेल्या आदेशानंतरच पोलिसांकडून हा लाठीमार केल्या गेल्याचा आरोप देखील शरद पवारांनी केला आहे.