जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जलसंपदामंत्री अजित पवार यांनी जलसंपदा खात्यात सत्तर हजार कोटी रुपये खर्च करताना, वाटेल तसे पराक्रम केले आहेत. 70 हजार कोटी रुपये खर्चूनदेखील एक टक्काही सिंचन न झाल्याने,त्यांच्या या पराक्रमामुळेच आम्हाला लोकांनी सत्ता दिली, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. जळगाव महापालिका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
मागील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात कोणतेही टेंडर देताना त्यात पारदर्शता दिसत नव्हती. मंत्री सांगेल त्यालाच हे टेंडर दिले जायचे आणि त्यात जास्तीचे पैसे लावून महाराष्ट्राची लूटही केली जात होती. मात्र आमच्या काळात आम्ही जलसंपदा खात्यात पारदर्शता आणल्यामुळे, आमच्यावर कोणी एक शिंतोडाही उडवू शकला नाही, असं गिरीश महाजन यांनी नमूद केलं.
जळगाव महापालिकेत भाजपाला सत्ता दिल्यास एकाच वर्षात जळगाव शहराचा विकास करुन, चेहरा- मोहरा बदलून टाकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतकंच नाही तर वर्षभरात जळगावचा कायापालट झाला नाही, तर विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.
खरी लढत शिवसेना-भाजपत
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जोरदार प्रचार सुरु आहे. जळगाव महापालिकेतील सत्तेचा इतिहास पाहता गेली 40 वर्षे शिवसेनेच्या सुरेश जैन गटाकडेच अखंडपणे ही सत्ता असल्याचं पाहायला मिळतं.
या सत्तेला आजपर्यंत कुणीही धक्का लावू शकलं नाही. आताच्या निवडणुकीतही शिवसेनेला बहुमत मिळेल असा विश्वास सुरेश जैन यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते युती करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र युतीसाठी प्रयत्न सुरु असताना गिरीश महाजन यांनी मात्र विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांना आपल्या गोटात सहभागी करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले होते.
महाजन यांच्या या प्रयत्नाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या महापौरांसह मनसेचे 12 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपात सहभागी झाल्याने भाजपाची ताकद नक्कीच वाढली आहे. गेल्या निवडणुकीत केवळ 15 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा बहुमताने विजयी होण्याचा विश्वास वाटू लागला आहे. मात्र गेली 40 वर्षे अखंड सत्ता असलेल्या सुरेश जैन यांच्या शिवसेनेला ते शह देऊ शकतात का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून सर्वच्या सर्व 75 जागा लढवल्या जात आहेत. तर शिवसेनेकडून 70 जागा लढवल्या जात असल्याने खरी लढत आता शिवसेना आणि भाजपमध्येच दिसणार आहे. राष्ट्रवादी 43 जागांवर, तर काँग्रेसने 16 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
संबंधित बातम्या आणि व्हिडीओ
रणसंग्राम महापालिकेचा : जळगावकरांसमोरचा नवा पर्याय कोणता? थेट जळगावातून
जळगाव महापालिकेत खरी लढत शिवसेना आणि भाजपातच!
अजितदादांच्या पराक्रमामुळे आम्हाला सत्ता मिळाली: महाजन
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
30 Jul 2018 08:07 AM (IST)
जळगाव महापालिकेत भाजपाला सत्ता दिल्यास एकाच वर्षात जळगाव शहराचा विकास करुन, चेहरा- मोहरा बदलून टाकू, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -