Rohini Khadse जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे जलजीवन मिशन योजनेत पाणी कसे मिळेल, यापेक्षा योजनेचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून कसे पूर्ण होईल आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल, असे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला आहे. 


सध्या जळगाव जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी (Water Crisis) टंचाई जाणवत आहे. त्यात मुक्ताईनगर मतदारसंघात बोदवड तालुक्यात त्याची तीव्रता अधिक आहे. या भागात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेचे काम केले जात आहे. एकीकडे राज्यासह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईचे भीषण सावट असताना त्यात आता राजकारण देखील तापल्याचे बघायला मिळत आहे.     


बोदवड तालुक्यात पाणीपुरवठा योजनेचा खेळखंडोबा 


जलजीवन मिशन योजनेचे काम करत असताना पाणी कसे दिले जाईल, याबाबत राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील हे काही ठोस सांगत नाहीत. मात्र, ठेकेदाराच्या माध्यमातून आपल्या योजना पूर्ण करून त्यातून पैसे कसे कमविता येतील हे पाहत आहेत. त्यामुळे बोदवड तालुक्यात पाणीपुरवठा योजनेचा खेळखंडोबा झाल्याचं पाहायला मिळत असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. 


रोहिणी खडसेंची चंद्रकांत पाटलांवर टीका


मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही रोहिणी खडसे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, आमदार सत्तेत आहेत, त्यांना पाच वर्षाचा कालावधी मिळाला आहे. अशा परिस्थितीमध्ये बोदवडमध्ये असलेली पाणी टंचाई पाहता आमदार कमी पडले आहेत किंवा त्यांच्यामध्ये काम करण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. 


बारामती हे शरद पवार यांच्यासाठी महत्वाचं ठिकाण आहे. आजपर्यंत जनतेने त्यांना या ठिकाणी नेहमीच साथ दिली आहे. यावेळी ही सुप्रिया सुळे यांना लोक मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असा आपला विश्वास असल्याचं सांगत त्यांचं निवडून येणे हेच विरोधकांना उत्तर राहणार असल्याचही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. कोण विजयी होणार हे आत्ताच सांगता येत नसले तरी जो कोणी निवडून येईल तो अतिशय कमी मताधिक्याने निवडून येणार असल्याचा आपला अंदाज असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या