Sharad Pawar PC : जळगाव : ओबीसींच्या कोट्यातून आणखी वाटेकरी करणे हासुद्धा ओबीसी गरीब लोकांवर अन्याय होईल, असं काही लोकांच म्हणणं आहे. हे एकदम दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्याला पर्याय हा आहे की, आज जी 50 टक्क्यांची अट आहे, यात आणखी 15 ते 16 टक्क्यांची वाढ करण्यात यावी, या संदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली, तर हे प्रश्न सुटतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त करत एकप्रकारे मराठा आरक्षणासंदर्भात मार्ग सांगितला आहे. 


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जालना येथील घटनेनंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण पुन्हा पेटले आहे. यावर शरद पवार यांनी केंद्र सरकारला मार्ग सांगितला आहे. ओबीसींच्या कोट्यातून आणखी वाटेकरी करणं हे सुद्धा ओबीसी गरीब लोकांवर अन्याय होईल, असं काही लोकांच म्हणणं आहे. हे एकदम दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्याला पर्याय हा आहे की, आज जी 50 टक्क्यांची अट आहे, यात आणखी 15 ते 16 टक्क्यांची वाढ करण्यासंदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली, तर हे प्रश्न सुटतील, असे शरद पवार म्हणाले आहेत. ओबीसी आणि इतर लोकांमध्ये मतभेद नको, त्यांच्यात वाद करायचा कुणी प्रयत्न करत असेल, तर आमचा त्यांना पाठिंबा नाही, असा सज्जड दमही शरद पवार यांनी दिला आहे. 


यावेळी शरद पवार सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, सामान्य लोकांच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी आणि ती माहिती शासनापर्यंत पोहचवावी, यासाठी हे दौरे आहेत. आज खानदेशातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलो. या भागात पाऊस नाही, म्हणून चिंताजनक स्थितीचे चित्र एकनाथ खडसे यांनी मांडले आहे. ज्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली, तेही पीक राहणार नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचीही स्थिती गंभीर आहे, अनेक गावांमध्ये चारा नाही, आजची गरज भागेल पण नंतर चाऱ्याची गरज पडेल. यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी शरद पवार यांनी केली. 


लोडशेडिंगचा प्रश्न गंभीर 


तसेच सध्या लोडशेडिंग मोठी चिंतेची बाब असून जळगाव जिल्ह्यात लोड शेडिंगचा प्रश्न गंभीर आहे. वीज पुरवठ्यात सातत्याने खंड पडत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजूला दुष्काळी स्थिती आणि दुसऱ्या बाजूला विजेची लोड शेडिंग यात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुबार पेरणी करूनही तेही पीक संकटात येण्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक घेतलं जातं, मात्र आज सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे, या कापसाला योग्य भाव मिळणे महत्त्वाच आहे. तसेच केळीसाठी हा जिल्हा महत्वाचा असून आता केळीची पिके अडचणीत सापडली आहेत. तर काही दिवसांपूर्वी पिक विमा देण्याचा निर्णय सरकारने केला, या योजेनबाबत शेतकऱ्याला याबाबत आशा होती, परंतु या योजनेतून शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे पवार म्हणाले. 


नाशिक, धुळे जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न महत्वाचा 


राज्यात दुष्काळ स्थिती गंभीर असल्याने कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात सूचना केल्या जात आहेत. यावर शरद पवार म्हणाले की, कृत्रिम पाऊसाचा अनुभव चांगला नाही, कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत मला काही फारसं माहिती नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत त्यात काही यश आले नसल्याचे पवार म्हणाले. सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. असलेली पिके वाचविणेसाठी शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि यासाठी अर्थसहाय्य करणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच नाशिक, धुळे या भागात कांद्याचा प्रश्न महत्वाचा असून सरकारने काही निर्णय चुकीचे घेतले. केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के ड्युटी लावली, त्याची किंमत कांदा उत्पादक चुकवावी लागली, कांदा उत्पादक शेतकरी, जिरायती शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलन केली. 


इतर महत्वाची बातमी : 


Sharad Pawar : पक्षफुटीनंतर शरद पवारांची जळगावमध्ये पहिलीच जाहीर सभा; आज कुणावर तोफ डागणार? काय बोलणार?