Kirankumar Bakale, Jalgaon News : जळगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत किरणकुमार बकाले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पोलीस उपधीक्षकांना चौकशी करून लवकरात लवकर अहवाल पाठवण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या कार्यकाळात अनेक खुनांसह कठीण गुन्ह्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. शिवाय गुन्ह्याची उकल करण्याचं प्रमाणही अलिकडच्या काळात वाढल्याचे दिसून आले होते.


एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी शेखर यांनी त्यांच्या निलंबनाच्या आदेश पारित केला आहे.


पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्य वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यावरून मराठा समाजासह विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या.  याची गंभीर दखल घेत बकाले यांची बुधवारी तत्काळ बदली करण्यात आली होती. तसेच दुसऱ्या दिवशी बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई  करण्यात आली आहे. या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून  पोलीस उपाधीक्षक यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर सविस्तर अहवाल लवकरात लवकर पाठवावा, असेही विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी शेखर यांनी पारित केलेल्या आदेशात म्हटले आहे.


किरणकुमार बकाले यांनी केलेले वक्तव्य हे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असून अशा प्रवृत्तींना पाठीशी घातले जाणार नाही. बकाले यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून कायदा व सुव्यवस्था अडथळा निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नये, तसेच पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.


आणखी वाचा : 


Buldhana Crime News : मुले चोरणारी महिला समजून तृतीयपंथियाला जमावाकडून बेदम मारहाण, पाच जण अटकेत
Pune Crime News : बापलेकाचं अश्लील कृत्य, महिलेला कंडोमचं पाकिट दाखवलं अन् म्हणाले...; दोघांवर गुन्हा दाखल