Jalgaon Dudh Sangh Election: जळगाव जिल्ह्याचं राजकारण सध्या दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलंच तापलं आहे. मागील सात वर्षाच्या काळापासून जळगाव दूध संघ एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थकांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या ताब्यातून दूध संघ घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच एकनाथ खडसेंना आज पुन्हा एक धक्का बसला आहे. जिल्हा दूध संघात भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका खंडपीठाने फेटाळली असून हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांनी औरंगाबाद खंडपीठात भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


जिल्हा दूध संघातील निवडणूकित मुक्ताईनगर मतदारसंघात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  


जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर मतदार संघातून यामुळे मंदा खडसे यांच्यासमोर आमदार मंगेश चव्हाण यांचे अतिशय प्रबळ आव्हान राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  आता एकनाथ खडसे विरुध्द भाजप आमदार मंगेश चव्हाण असा सामना यंदाच्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत रंगणार असून यात बाजी कोण मारत हे पाहण महत्वाचं असणार आहे.


दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे.  या दोन्ही नेत्यांच्या मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने खडसे हे एकटे पडल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. एकनाथ खडसे एकटे पडले दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठीही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. 


पुढील महिन्यात दहा डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यात कायदेशीर लढाई अजून सुरूच आहे. न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर कोणाचे पारडे जड ठरते हे कळणार असले तरी आज मात्र काट्याचा संघर्ष यात पाहायला मिळत आहे.  


ही बातमी देखील वाचा


Jalgaon: जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत रणकंदन; एकनाथ खडसे एकटे पडले, तरीही विजयाचा विश्वास- कसं आहे राजकारण?