सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर दोन्ही नेते आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छूक होते. परंतु घरकुल घोटाळाप्रकरणी न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेमुळे या दोन्ही नेत्यांचं विधानसभा निवडणूक लढण्याचं स्वप्न भंगलं आहे. या शिक्षेमुळे दोन्ही नेते निवडणूक लढू शकत नाहीत.
यासंदर्भात एबीपी माझाने ज्येष्ठ विधिज्ञ दिलीप तौर यांच्याशी बातचित केली. यावेळी तौर यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी कायद्याच्या (Representation of the People Act) कलम 8 (3) अन्वये एखाद्या व्यक्तीवरील गुन्हा सिद्ध होऊन त्या व्यक्तीला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास ती व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते.
सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांनी गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची तयारीदेखील सुरु केली होती. सध्या राष्ट्रवादीत असलेले गुलाबराव देवकर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास इच्छूक होते, अशी चर्चा आहे. देवकर भाजप नेते गिरीश महाजन यांना भेटल्यापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे.
व्हिडीओ पाहा
दरम्यान, बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री, शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वच आरोपींना दोषी ठरवलं आहे. निकाल देताना न्यायालयाने जैन, देवकर यांच्यासह सर्वच 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात न्यायाधीशांनी आरोपींच्या वकिलांना, तुम्हाला काही मांडायचे आहे का? असे विचारले. त्यावर आरोपींच्या वकिलांनी आरोपींचा या घरकुल घोटाळ्याची कोणताही संबंध नाही, ते आता वयोवृद्ध आहेत असेच म्हणत जोरदार युक्तीवाद केला.
आरोपींना विविध व्याधी आहेत म्हणून त्यांना न्यायालयाने माफी द्यावी, असा बचावात्मक पवित्रा त्यांच्या वकिलाने घेतला. यावर आरोपी असलेल्या सर्व नगरसेवकांनी कट-कारस्थान करुन हा गुन्हा संगनमताने केला, असे सरकारी वकिलांनी कोर्टापुढे मांडले. नगरसेवकांनी जागा नसताना घरकुलाचा ठराव का केला? तसेच आजवर या प्रकरणी ताब्यात असलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या व्याधी नाहीत.
लोकांचा पैसा असल्याने लोकांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे होता, असे प्रभावी मुद्दे मांजले. या प्रकरणामुळे लोकांच्या पैशाचा अपव्यय झाला असून यातील सर्व आरोपींना शिक्षा देण्यात यावी, असा सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला.
या खटल्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह 52 आरोपी आहेत. यातील तीन आरोपी मृत झाले असून एक आरोपी फरार आहे. न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले. त्यावेळी या खटल्यातील सर्व 48 आरोपी हजर होते.
याआधी निकाल तयार करण्याच्या सुरु असलेल्या कार्यवाहीमुळे तसेच काही तांत्रिक बाबींमुळे याआधी तब्बल सहा वेळा या खटल्याचा निकाल लांबणीवर पडला होता.
वाचा : काय आहे संपूर्ण प्रकरण