मुंबई : अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबईतल्या कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये तुफान गर्दी झाली आहे. कोकणात जाण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुंबईमधून जादा 1080 एसटी सोडण्यात येत आहेत. यातून साधारणतः 48 हजार प्रवासी प्रवास करतील. एकट्या कुर्ला डेपोमधून 256 जादा एसटी आज सोडण्यात येत आहेत.
कोकणात रवाना करण्यासाठी औरंगाबाद, नाशिक, पुणे इत्यादी विभागातून 950 एसटी मुंबईत दाखल झाल्या आहेत. कुर्ला डेपोत या चालक आणि वाहकांसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चालकांची अल्कोहोल टेस्टही घेतली जात आहे. आज रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरातील कोकणवासी एसटीमधून प्रवास करणार आहेत.
दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवासाठी गावी जाताना चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेदेखील सज्ज आहे. यासाठी नियोजित रेल्वे गाड्यांसोबतच काही विशेष गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या होणार आहेत तर रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले जाणार आहेत. त्याचसोबत दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला 30 ऑगस्टपासून सावंतवाडीत थांबा दिला जाणार आहे. याचा सात लाखांहून अधिक प्रवाशांना लाभ होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नियोजित गाड्यांबरोबरच खास रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग खिडक्या उपलब्ध केल्या आहेत. तसेच 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी सुरु केली आहे. यादरम्यान तिकीट तपासणी कडक केली जाणार आहे. तसेच खाद्यपदार्थ स्टॉलवर बेबी फुड उपलब्ध असेल, अशी माहिती आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची एसटी डेपोत गर्दी, 1080 जादा बसेस, सुरक्षेसाठी चालकांची अल्कोहोल टेस्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2019 05:09 PM (IST)
अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबईतल्या कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये तुफान गर्दी झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -