Jalgaon News: जळगाव दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे यांची कोंडी करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि काही आमदार मैदानात उतरल्याने एकनाथ खडसे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र या सर्वांना आपण लढा देणार असून त्यात आपलाच विजय होईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्याचं राजकारण सध्या दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलंच तापलं आहे. मागील सात वर्षाच्या काळापासून जळगाव दूध संघ एकनाथ खडसे समर्थकांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या ताब्यातून दूध संघ घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.
यामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर त्यांच्या सोबतीला आघाडीच्या फळीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तर शिंदे गटाचे आ. चंद्रकांत पाटील हे खडसे यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.
मुक्ताईनगर मतदार संघ हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला राहिला असल्याने या ठिकाणी त्यांना पराभूत करणे कठिण असल्याने याच बालेकिल्ल्यात खडसे यांच्या वर्चस्वाला आता सुरुंग लावण्याची भूमिका त्यांच्या विरोधकांनी घेतली आहे. मागील काळात विधानसभा निवडणुकीत याची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळाले होते. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना तिकीट न देता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले होते. आपल्या विजयाच्या भीतीनेच आपल्याला तिकीट देणे टाळले असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता.
रोहिणी खडसे यांच्या पराभवानंतर आणि आ चंद्रकांत पाटील यांच्या विजयानंतर मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांची पकड काहीशी सैल झाल्याचं लक्षात घेता आता दूध संघात त्यांची असलेली पकड ही कमी करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मुक्ताईनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या पुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षात एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुक्ताईनगर मतदारसंघात एकही तुल्यबळ उमेदवार उभा राहत नसल्याने त्यांची पकड दिवसागणिक घट्ट होत गेल्याचं पाहायला मिळालं आहे.
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असतानाच गिरीश महाजन आणि त्यांच्यात राजकीय रोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले होते. सुरुवातीच्या काळात पक्षात असलेली अंतर्गत धुसफूस नंतर मात्र विस्तवात रूपांतर झाली आणि दोन्ही नेते एकमेकांचं राजकारण संपविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं दिसू लागले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना आपल्यावर मोक्का सारखा गुन्हा दाखल करून खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पेन ड्राईव्हमुळे तो उघडा पडला असल्याचं सांगत आगामी काळात खडसे यांचे कारनामेही बाहेर येतील आणि मग कळेल काय ते अस गिरीश महाजन यांनी म्हटलं.
तर दुसरीकडे आपल्याला ही राजकीय आकसापोटी विविध चौकशा लावून छळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मागील काळात विधानसभा निवडणुकीत महाजन गटाला खडसे यांना पराभूत करण्याची संधी मिळाली असली तरी जिल्हा बँक निवडणुकीत मात्र यश मिळाले नसल्याने तोंडघशी पडावे लागले होते.
आता पुन्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांच्या मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र आज तरी दिसत आहे.
एकनाथ खडसे एकटे पडले दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठीही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे.
पुढील महिन्यात दहा डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यात कायदेशीर लढाई अजून सुरूच आहे. न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर कोणाचे पारडे जड ठरते हे कळणार असले तरी आज मात्र काट्याचा संघर्ष यात पाहायला मिळत आहे.