Gayran Encrochment in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात 15 नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. 


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमणे काढून टाकण्याचा कालबद्ध आराखडा निश्चित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होणार असली, तरी त्यामुळे जिल्ह्यातील सव्वा लाखाहून अधिक अतिक्रमणे निघणार असून, सुमारे सहा लाख नागरिक बेघर होणार आहेत. त्यामुळे घरे हटवल्यास हक्काचा निवारा नाहीसा होणा आहे. त्यामुळे राज्य सरकारने अतिक्रमण कारवाई थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात तत्काळ याचिका दाखल करावी, जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


गायरान जमिनीतील अतिक्रमणे काढण्यासाठी तालुका स्तरावर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने गायरान अतिक्रमणे तत्काळ काढण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी भूमिका घेत स्थगिती देण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  1 लाखांहून अधिक अतिक्रमणे निघण्याची शक्यता असून त्यामुळे सहा लाखांवर बेघर होणार आहेत.  


तालुकास्तरीय समितीत सचिव म्हणून गटविकास अधिकारी, सदस्यपदी तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, अपर तहसीलदार, पोलिस निरीक्षक किंवा सहायक पोलिस निरीक्षक काम पाहतील. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, तालुका पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता, पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, महावितरणचे तालुका उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका भूमिअभिलेख अधीक्षक व नगरभूमापन अधिकारी यांचाही यात समावेश आहे.


इतर महत्वाच्या बातम्या