जळगाव : राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढच होताना दिसत आहे. जळगावमध्ये चार वर्षाच्या बालिकेवर एका पंचवीस वर्षाच्या तरुणाने अत्याचार केल्याची दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.


मागील आठवड्यात चाळीसगाव शहरात एका सोळा वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आज रात्रीच्या सुमारास पुन्हा एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


पीडित बालिकेच्या नात्यातील एका तरुणाने बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवत घराच्या बाहेर नेले. काही वेळानंतर पीडित मुलीला घरी सोडण्यासाठी सदर तरुण मुलीच्या घरी आला असता मुलगी रडत असल्याचे आणि तिचे कपडे रक्ताने माखले असल्याने तिच्या आईला संशय आला.


यावेळी तरुणाची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याच्या या उत्तराने मुलीच्या घराच्यांना  मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय आल्याने त्यांनी सदर तरुणाला जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


या घटनेत सदर तरुणाला बेदम मार लागल्याने त्याला आणि पीडित मुलीला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तरुणाच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha