बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी चोवीस अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परळी पोलिस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता. 2015-16 या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी 24 कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला.
परळी तालुक्यातील 307 कामांमध्ये कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन बोगस कामं केली. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर 18 कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं होतं. आता एकूण 24 कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले.
एकूण दोन कोटी 47 हजार 672 रुपयांचा हा अपहार असल्याचं उघड झालं. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी लावून धरली होती. कृषी आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार परळी तालुक्याचे कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अपहार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
जलयुक्त शिवार घोटाळा : पंकजांच्या परळीमध्ये 24 कर्मचाऱ्यांवर गुन्हे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Mar 2018 10:56 AM (IST)
बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -