मुंबई: कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. वाशिंद जवळील पडघा इथं हा मोर्चा दाखल झाला आहे.

त्यांचा आजचा मुक्काम भिवंडी इथं असेल. हजारोंच्या संख्येने निघालेला हा लाँग मार्च 12 मार्चला विधीमंडळावर धडक देणार आहे.

जोवर मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोवर विधीमंडळाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याआधी राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारुन सरकारविरोधातला आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारनं 35 हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र त्यातून फारसं कुणाच्या हाती काही लागलं नाही, अशी तक्रार समोर येत होती.

सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार पाठीशी उभे राहत नसल्यान शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने दिलेली कर्जमाफीही फसवी असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेने मोर्चाचे हत्यार उपसालं आहे.

मागण्या काय आहेत?

-कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात

-शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या

-शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

-स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा

-वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा

-पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा