मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आधी मूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि आता जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.
‘सार्वत्रिक जेलभरो’
मुंबईतल्या आझाद मैदानावर सार्वत्रिक जेलोभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होईल. तर तिकडे ठाणे, परभणी, नंदुरबार, मनमाड, इंदापूर इथंही मराठा मोर्चाकडून सार्वत्रिक जेलभरो केला जाणार आहे.
‘जुन्नर बंद’ची हाक
पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांना एक दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
“आम्हीच आरक्षण देऊ”
मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आमचंच सरकार देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सर्वेक्षण पूर्ण, मागासवर्ग आयोगाकडे अहवाल सुपूर्द
मराठा आरक्षणाबाबतचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून, सर्वेक्षण करणाऱ्या पाच संस्थांनी अहवाल मागासवर्ग आयोगाकडे सोपवला आहे. येत्या 3 आणि 4 ऑगस्ट रोजी मागासवर्ग आयोगाने मराठा आराक्षणासंदर्भात विशेष बैठक बोलावली आहे.
लातुरात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न
लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये 8 मराठा आंदोलनकांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनं जिल्ह्यांत खळबळ उडाली आहे. काल सकाळी आंदोलकांनी औसा तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. मराठा आंदोलकांपैकी 8 आंदोलकांनी अंगावर रॉकेल ओतून एकत्रपणे आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ थांबवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.
चाकण हिंसाचार प्रकरणी 4-5 हजार जणांवर गुन्हे
पुण्यातल्या चाकणमध्ये मराठा आंदोलनावेळी झालेली तोडफोड आणि जाळपोळ ही स्थानिकांनी नव्हे तर बाहेरच्या लोकांनी केलीय, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ग्रामीण भागातून आलेला जमाव, औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आलेले कामगार आणि चौक भागातील झोपडपट्ट्यांमधील काही टोळक्यांकडून हिंसाचार झाला असण्याची शक्यता आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, जाळपोळीप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक एसटी बससेवा अद्यापही बंद
चाकणमधील परिस्थिती निवळली असली, तरी एसटी महामंडळाची पुणे-नाशिक बससेवा अद्यापही बंद ठेवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी प्रशासनाने एसटी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. चाकणमध्ये मराठा आंदोलनादरम्यान एसटी बसेस पेटवण्यात आल्या होत्या. त्यामुळे खबरदारी म्हणून शिवाजीनगर बस स्थानकातून नाशिककडे आणि नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.
आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी ठोक मोर्चे सुरु केले आहेत. आधी पन्नासहून अधिक मूक मोर्चे काढूनही सरकारला जाग न आल्याची टीका करत, मराठा क्रांती मोर्चाने अखेर ठोक मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.
मराठा क्रांती मोर्चाचा आज राज्यभर ‘जेलभरो’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2018 07:21 AM (IST)
आधी पन्नासहून अधिक मूक मोर्चे काढूनही सरकारला जाग न आल्याची टीका करत, मराठा क्रांती मोर्चाने अखेर ठोक मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -