पुणे : गुळाचा चहा.... सध्या ठिकठिकाणी हा नवा व्यवसाय सुरु झाल्याचं आपण पाहतोय. गुळाच्या चहाची विक्री करताना, चहा प्रेमींना दुकानमालक गुळाचे फायदे ही पटवून देत आहेत. परिणामी अनेक घरात साखरेची जागा गुळाने घेतल्याचं पहायला मिळतंय. म्हणूनच अलीकडे साखरेपेक्षा गुळाचा भाव अधिक वाढू लागली आहे  

गुळाचा चहा.... चहा प्रेमींच्या पसंतीला पडलेला हा एक चहाचा प्रकार. गुळामुळे प्रतिकार शक्ती वाढते, असे सांगितले जाते. कोरोना काळात तर अनेक आयुर्वेदिक काढ्यात गुळाचा वापर केला जातो. अनेक शहरांमध्ये गुळाचा चहा विकणारी दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे मागणी वाढली आहे. घरगुती ग्राहकांकडूनही गुळाला मागणी वाढली आहे. वर्षभरात अनेक शहरात खास गुळाच्या चहाची विक्री करणारी दुकाने सुरू झाली आहे. कोरोनाने जीवनचक्र बदललंय. प्रत्येकजण निरोगी आरोग्यासाठी आहार आणि सेवनात सेंद्रिय पदार्थाला प्राधान्य देतंय. म्हणूनच की काय साखरेऐवजी गुळाला अधिकची पसंती मिळू लागली आहे.

  वर्ष  गूळ (प्रति क्विंटल)    साखर  
2017  2450 - 3150   3100 -3250
2018   2600-3300 3200-3300
2019  2850-3300 3250-3300
2020  3000-3500  3300-3350
2021  3500-3600  3300-3350

साधारण दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत दुकानदार गुळाला गोडाऊनमध्ये ठेवायचे. मात्र जेव्हापासून हा गूळ आरोग्यासाठी लाभदायक आहे, अशी चर्चा सुरु झाली. तेव्हापासून ग्राहकांकडून देखील या गुळाची मागणी वाढली. मग दुकानदार देखील या गुळाला अग्रस्थानी ठेऊ लागले. म्हणूनच साखरच्या तुलनेत गुळाचे दर आपल्याला अधिक पहायला मिळत आहे. 

आहार अथवा सेवनात गूळ असेल तर तो आरोग्यास नक्कीच लाभदायक आहे. पण त्याचं प्रमाण किती असावं? याबाबत वेगवेगळी मतमतांतरे आहेत. त्यामुळं गुळाला पसंती देताना, त्याचं प्रमाण मात्र डॉक्टर अथवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवा.