नांदेड :  देशात दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळातील मोठ्या समस्या आहेत. त्यावर पर्यायी मार्ग म्हणून आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटरचा पर्याय स्वीकारत आहे. अशातच नांदेडच्या अर्धापूर शहरामधील बेरोजगार तरुणाने प्रदूषण मुक्त चार्जिंगची सायकल बनवली आहे.


अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौक परिसरामध्ये रहात असलेल्या शिवहार प्रकाश घोडेकर या 32 वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषण मुक्त अशी सायकल तयार केली आहे. फक्त पाच रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल 35 ते 40 किमीचे अंतर पार करता येते. त्या ही सायकल बनवण्यासाठी चौदा हजार रुपये खर्च आला. त्याच्या या कलेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.


अर्धापूर शहरांमध्ये पान ठेल्याचे दुकान चालवत शिवहारने शिक्षण पूर्ण केले. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत वायरमॅनचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी रेल्वे डिव्हिजनमध्ये तीन वर्ष आणि महावितरणमध्ये तीन वर्ष कंत्राटी पदावर काम केले. पण गेल्या दोन वर्षापासून कोणतेही काम नसल्याने तो पानठेला चालवायचा. लॉकडाउनमुळे सर्व अस्थापना बंद असल्याने त्याचं पान ठेल्याचं दुकानही बंद झालं. त्यानंतर त्याने चार्जिंगवरील सायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प करत विजेवर चालणारी सायकल तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्याच्या या वैज्ञानिक कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली आहेत. मात्र चार्जिंगवर बनवलेली सायकल पहिल्यांदाच बनवण्यात आली. ही सायकल पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठी गर्दी करत आहे.


5 रूपयात 40 किमी पार


चार्जिंग सायकल बनवण्यासाठी शिवहारला 14 हजार रुपये खर्च आला. मोटार 24 होल्ट 350 वॅट, बॅटरी 24 होल्ट 350 वॅट, चार्जिंग किट, लाईट ,गिअर एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक यांच्यासह वेल्डींगचा वापर करत ही सायकल बनविण्यात आली आहे. या सायकलवरुन 5 रूपये चार्जिगवर 40 किमी अंतर पार करता येते.


येत्या काळात या चार्जिंग सायकलवर आणखी संशोधन करून चार्जिंग फ्री मध्ये होण्याची व्यवस्था व्हावी आणि पुढील काळात सायकल चालवताना चार्जिंग व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवहार याने दिली आहे.