मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झालाय. कोरोनाच्या महामारीच्या काळात देखील प्रामाणिक सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे. इतर महामंडळाचे वेतन थकले नसतांना सरकारला उत्पन्न देणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकीत का ? असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. इतर महामंडळाच्या तुलनेनं एसटी महामंडळाचा परिपत्रक काढण्यात कोणी हात धरू शकत नाही . एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन कधी होणार या बाबत परिपत्रक न काढता उलट आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची भाषा म्हणजे तुघलकी असल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
5 ऑक्टोबर 2020 च्या कर्मचारी व औद्योगिक संबंध अधिकारी विभागाचे महाव्यवस्थापक शैलेश चव्हाण यांच्या स्वाक्षरीनिशी असलेल्या तीन पानी पत्रकात एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत पगाराबाबत एसटी कामगार संघटनेच्या एल्गारचा उल्लेख करण्यात आलाय . 7 ऑक्टोबर पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत तीन महिन्यांचे पगार न झाल्यास 9 ऑक्टोबर पासून एसटीच्या राज्यातील प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण आंदोलन करण्याचा इशारा एसटी कामगार संघटना या एसटीच्या अधिकृत संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांनी या उपोषण आंदोलनात सहभाग घेतल्यास गैरवर्तणुकीची बाब समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल या प्रकारच्या सूचना सर्व कर्मचारी यांच्या व्यक्तिशः निदर्शनास आणाव्यात. या सूचनेची प्रत कर्मचाऱ्यांना दिसेल अशा ठिकाणी लावाव्यात.कर्मचाऱ्यांनी या उपोषण आंदोलनात सहभाग घेऊ नये यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. उपोषण काळात एसटीच्या दैनंदिन सेवेवर परिणाम होणार नाही, प्रवाशांची गैरसोय होणार नाही या दृष्टीनं उपाययोजना करण्यात याव्यात. गरज भासल्यास गृहरक्षक, पोलीस दलाची मदत घ्यावी तसेच आंदोलन काळात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती सकाळच्या सत्रातील माहिती दुपारी 2 वाजेपर्यंत, दुपारच्या सत्रातील माहिती दुपारी 4 वाजेपर्यंत मुख्य कामगार अधिकारी यांच्याकडे पाठवावी असं महाव्यवस्थापक शैलेश चव्हाण यांच्या स्वाक्षरीनिशी असलेल्या तीन पानी पत्रकात नमूद करण्यात आलंय. मात्र या पत्रकात एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत तीन महिन्यांचा पगार कधी , किती दिवसात होऊ शकतो याबाबत कुठलाही उल्लेख नाही. कामगारांनी तीन महिन्यांचे पगार नाही हे कोणत्या कामगार कायद्यात आहे? असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय.