मुंबई : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे.  कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. ज्यांना कोरोना झाला त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात मग त्यांनीसुद्धा कोरोनाचे दोन डोस घ्यायचे का? या संदर्भात एक संशोधन करण्यात आले आहे


ज्यांना पुर्वी कोरोना झाला होता...त्यांच्यासाठी लसीचा एकच डोस पुरेसा आहे असे संशोधन पुढे आले आहे. 17 एप्रिलला प्रकाशित झालेल्या या संशोधनावर जगात चर्चा सूरू झाली आहे. दुसऱ्या लाटेला सामना करत असलेल्या आणि लसीचा तुटवडा असलेल्या  भारतासाठी हे संशोधन वरदान ठरु शकते. अशी तीन संशोधन जगात झाली आहेत. 15 एप्रिलला प्रकाशित करण्यात आलेल्या अमेरिकेतल्या संशोधनाच्या तीन संशोधकांपैकी एक संशोधक भारतीय आहे.


भारतात लसीसाठी रांगा लागल्या आहेत. 138 कोटींच्या भारत देशात लसींचे दोन्ही डोस देण्यासाठी किमान एप्रिल 2022 येईल. अशा काळात 17 एप्रिलला सायन्स इम्युनोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या पेन इन्स्टीट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीच्या संशोधन मोठे बदल घडवून आणू शकेल.  जगभरात या संशोधनावर चर्चा सुरू आहे. 20 पानांचे हे संशोधन प्रकाशित झाल्यावर ज्यांना कोरोना झाला होता त्यांना कोरोनाचा कोणत्याही लसींचा एक डोस पुरेसा आहे असे हे संशोधन सांगते. विशेष म्हणजे तीन संशोधकांपैकी एक संशोधक भारतीय आहेत.



काय आहे संशोधन ?


17 डिसेंबरपासून अमेरिकेत लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. आता पर्यंत सुमारे 9 कोटी अमेरिकन नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वयोवृध्द नागरिकांचे 67 टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणानंतरच्या पाठोपाठ अमेरिकेत हा अभ्यास सुरू झाला की ज्यांना कोरोनाची बाधा झाली आणि ज्यांना झाले नाही त्यांच्यावर व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा काय परिणाम झाला. कोरोनावर मात केलेल्या लोकांमध्ये mRNA व्हॅक्सीनच्या पहिल्या डोसनंतर अँटीबॉडी रिस्पॉन्स खूप चांगला दिसला. पण दुसऱ्या डोसनंतर इम्यून रिस्पॉन्स तेवढा नव्हता. संशोधकांचा दावा आहे की ज्यांना कोरोना इन्फेक्शन झाले नव्हते, त्यांच्यामध्ये अँटीबॉडी रिस्पॉन्स दुसरा डोस नंतर तेवढा  नव्हता. याचा अर्थ ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांच्यासाठी करोनाच्या कोणत्याही लसीचा एक डोस पुरेसा आहे


यामागचे विज्ञान काय आहे?


कोणत्याही विषाणू विरूद्ध मानवी शरीर संघर्ष करते. जेव्हा शरीर कोणत्याही विषाणूंविरुद्ध लढण्यास सक्षम होते तेव्हा अँटीबॉडी तयार होतात. या अँटीबॉडी दोन प्रकारच्या असतात. एक टी किलर पेशी आहेत ज्या विषाणू नष्ट करतात. दुसऱ्या मेमरी B सेल्स अँटीबॉडी असतात. भविष्यात विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास त्यास ओळखणे आणि रोगप्रतिकारक यंत्रणेस सतर्क करणे हे मेमरी बी सेलचे काम आहे. या सेल विषाणूंचा पुन्हा हल्ला झाल्यास किलर पेशी तयार करण्यास सुरुवात करतात. सध्या आपल्याकडे कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतलेल्यांचे दुसरा डोस चुकला तर काय होईल याची चिंता आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये एकूण तीन संशोधनात कोरोनाची एकच लस पुरेशी आहे असा दावा करण्यात आला आहे.


ब्लूमबर्ग या प्रकाशनांने ज्यांना कोरोनाची बाधा झाली होती त्यांना दोन डोसची गरज नाही हे ओळखून इटली, जर्मनी आणि इस्त्राईल या देशाने एकच डोस देण्याचे ठरवले आहे असा दावा केलाय. अमेरिकेतून आणखी एक संशोधन प्रकाशित झाले आहे त्यातही हा दावा केला गेलाय. त्यामुळे जगभरात हा मुद्दा चर्चेचा होवू शकतो. पण भारतात यावर संशोधन झालेले नाही. तसे संशोधन झाले आणि त्याचे परिणाम सकारात्मक आले तर लसींच्या व्यवस्थापनात मोठे बदल होतील. लसींची संख्या कमी होईल आणि लसीकरणासाठी लागलेल्या रांगा लवकर कमी होतील