कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शित्तूरतर्फे मलकापूर इथले महादेव गणपती पाटील आणि त्यांची पत्नी सीमा यांचा कोरोनानं मृत्यू झाला. पोरक्या झालेल्या दोन मुलांकडे पाहून अनेकांना हुंदका आवरता येईना. महादेव हे पुण्यामध्ये एका कंपनीत मोठ्या पदावर होते. लॉकडाऊनमुळे पत्नी आणि मुलांसह ते मूळगाव असलेल्या शित्तूर तर्फे मलकापूर याठिकाणी आले. काही दिवसांपूर्वी पत्नी सीमा यांना त्रास होऊ लागला. मनात शंका नको म्हणून टेस्ट केली तर महादेव आणि सीमा या दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर पूर्वा आणि तन्मय या दोन्ही मुलांची टेस्ट निगेटिव्ह आली. 


किरकोळ त्रास होत असल्यानं कमी होईल या विश्वासानं ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हॉस्पिटलला जाताना नऊ वर्षांची पूर्वा आणि सहा वर्षांच्या तन्मयला धीर दिला. बाळांनो, काळजी करु नका आम्ही बरे होऊन लवकर घरी येतो. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. बुधवारी दुपारनंतर सीमा यांची प्रकृती खालावली. त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या.अखेर त्यांना कोरोनानं हरवलं...हा धक्का महादेव यांना सहन झाला नाही. पत्नीच्या मृत्यूनं खचलेल्या महादेव यांची तब्येत देखील बिघडत गेली. गुरुवारी रात्री त्यांनी देखील अखेरचा श्वास घेतला. 


मुलांना शेवटचे दर्शन देखील नाही


घरी लवकर येतो म्हणणारे आई-बाबा अजून आले नाहीत. त्यांच्या वाटेकडे पूर्वा आणि तन्मय डोळे लावून बसलेत.पण ते दोघे आता कधीच परत येणार नाहीत हे अजून त्या चिमुकल्यांना सांगण्यात आलं नाही. या दाम्पत्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. महादेव यांचा भाऊ क्वारंटाईन असल्यानं त्यांना येता आलं नाही. मुलांना संसर्गाचा धोका नको म्हणून आणले नाही. त्यामुळं आई-वडिलांचं शेवटचं दर्शन देखील त्यांना घेता आलं नाही.