मुंबई : आयआरसीटीसीची प्रायव्हेट तेजस एक्सप्रेस बंद होणार आहे. येत्या 24 तारखेपासून मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या सर्व फेऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे पत्र आयआरसीटीसीने लिहिले आहे. केवळ मुंबई - अहमदाबाद नाही तर दिल्ली लखनऊ मार्गावर धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस देखील 23 तारखेपासून बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. या दोन्ही एक्स्प्रेस'ला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते आहे. त्यामुळे भारतातील खाजगी ट्रेनचे भवितव्य धोक्यात आले आहे.


याच वर्षी जानेवारी महिन्यात मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर खाजगी तेजस एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली लखनऊ या मार्गावर पहिली खाजगी एक्सप्रेस चालवण्यात आली होती. वधुनी एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद आहे असे सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतर covid-19 मुळे लॉकडाऊन झाले. तेव्हापासून दोन्ही एक्सप्रेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. 17 ऑक्टोबर पासून मुंबई - अहमदाबाद ही ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली होती, मात्र एका महिन्यातच प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने ट्रेन बंद करण्याची वेळ आयआरसीटीसीवर आली आहे. आता जरी ही ट्रेन बंद करण्यात येत असली तरी जर प्रवाशांची मागणी वाढली तर पुन्हा एकदा ही ट्रेन सुरू करण्यात येईल असेही आयआरसीटीसीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर पश्चिम रेल्वेच्या तीन ट्रेन धावत आहेत. त्यात 02933/02934 स्पेशल (कर्णावती एक्सप्रेस), 0293102932 स्पेशल (डबल डेकर एक्सप्रेस), 02009/02010 स्पेशल (शताब्दी एक्सप्रेस) या एक्सप्रेसचा समावेश आहे. या गाड्यांना दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान असलेला प्रवाशांचा प्रतिसाद असा होता.


02933 मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद - 136.97%
02934 अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल 160.94%
02931 मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद 60%
02932 अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल 109.00%
02009 मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद 69.93%
02010 अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल 71.80%


यावरून पश्चिम रेल्वेकडून मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर येणाऱ्या आणि जाणार्‍या दोन्ही गाड्यांना चांगला प्रतिसाद आहे असे दाखवण्यात येत आहे. मात्र या गाड्या जरी प्रतिसाद चांगला असला तरी तेजस एक्सप्रेस ला मात्र अतिशय कमी प्रतिसाद असल्यानेच आयआरसीटीसीने हा निर्णय घेतला आहे. याच मार्गावर भारतातील पहिली बुलेट ट्रेन देखील त्या काळात धावणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बुलेट ट्रेन हवी की नको हा वाद आता निर्माण होऊ शकतो. तसेच केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात सुरू करत असलेल्या खाजगी गाड्यांचे देखील भवितव्य आता अधांतरी झाले आहे.