IPS Krishna Prakash meet Sharad Pawar : आयर्नमॅन पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश तडकफडकी बदलीमुळं भलतेच नाराज झाले आहेत. म्हणूनच आज ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या दरबारात पोहोचले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवारांच्या शब्दाला किती महत्व हे सर्वश्रुत आहेच. म्हणूनच कृष्ण प्रकाश बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांना साकडं घालायला आलेत, अशी चर्चा आहे.
आठवड्याभराची सुट्टी घेऊन कृष्ण प्रकाश हे परदेशात होते. तेव्हाच गृहविभागाने त्यांची उचलबांगडी केली अन् नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदेंनी तातडीनं पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची सूत्रंही हाती घेतली. पण अद्याप कृष्ण प्रकाशांनी त्यांचा नवा पदभार हाती घेतलेला नाही. कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची अशी उचलबांगडी केल्याने ते भलतेच नाराज झालेत.
या बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी ते शरद पवारांच्या दरबारात पोहोचल्याचं बोललं जातंय. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांच्या बदलीसोबत ठाणे आणि कोकणातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्यांना मंत्री एकनाथ शिंदेंनी बारा तासाच्या आतच स्थगिती आणली. तशीच स्थगितीचा सुधारित आदेश आणण्यासाठी कृष्ण प्रकाश खटाटोप करताना दिसतायेत. आता पवारांना साकडं घातल्यानंतर कृष्ण प्रकाशांच्या पदरी काय पडतं हे पहावं लागेल.
आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्याने नाराज आहेत. तीच नाराजी व्यक्त करण्यासाठी आज कृष्ण प्रकाश यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कृष्ण प्रकाश आणि शरद पवार यंच्यात जवळपास 5 ते 10 मिनिटे चर्चा झाली.
भेट झाल्यानंतर कृष्ण प्रकाश यांना भेटीचे कारण विचारलं असता त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. कृष्ण प्रकाश भेटून गेल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी शरद पवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनीही बोलण्यास नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या:
- कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडमधून बदली; आता 'व्हीआयपीं'ची सुरक्षा सांभाळणार
- 'मटणवाले चाचा' IPS कृष्णप्रकाश...! वेशांतर करुन पोलिसांची घेतली भन्नाट 'परीक्षा'!
- आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याची पिंपरीत चर्चा!