Ravi Rana : शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होतोय, तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच असे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले. हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा यांनी केले. 


शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले पाहिजे. आता बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं असे रवी राणा म्हणाले. पोलीस आम्हाला रोखत आहेत, तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा आरोपही यावेळी रवी राणा यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हनुमान चालीसाला विरोध करत असल्याचे ते म्हणाले. शिवसैनिक गुंडगर्दी करत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर जात आहे. मी त्याठिकाणी महाराष्ट्राच्या शांततेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी जात असल्याचे राणा यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या  हृदयात आहेत. सध्या मुख्यमंत्री मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असल्याचे राणा म्हणाले.


गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु असल्याचं दिसत आहे. अशातच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांना घराबाहेर येण्याचे आवाहन शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप राणा दाम्पंत्य घराच्या बाहेर पडले नाही. पण त्यांनी आज मातोश्रीवर जाणारच असल्याचे सांगितले आहे.


आम्हाला घरामध्ये बंद करुन ठेवले आहे. आमच्या घराबाहेर एवढे लोक जमले आहेत, त्यांना काहीही बोलले जात नाहीत. त्यांना का रोखले नाही असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला. आम्हाला घराबाहेर का जाऊ दिले जात नाही? असे नवनीत राणा म्हणाल्या. पोलीस प्रशासनावर देखील नवनीत राणा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस कोणच्या दबाबावाखाली काम करत आहेत. पोलीस प्रशानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोप त्यांनी लगावला.  हनुमान चालीसाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढा विरोध का करत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.