Pandharpur Ashadhi Wari 2022 : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना आषाढी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचा मान हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. त्याप्रमाणं उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिलं आहे. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.


निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चाही केली. पंढरपूरमधील विकास कामांचे चांगल्या पद्धतीनं नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने 73 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत चर्चा झाली. अशा पद्धतीनं निधी देण्याचं जाहीर करुन, तो लगेचच उपलब्ध करुन दिल्याबद्दल समितीनं समाधान व्यक्त केलं. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विठ्ठलाची मुर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कार केला.


संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 21 जूनला प्रस्थान करणार


दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखी प्रस्थान सोहळा 21 जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सोहळा 9 जुलैला पंढरीत पोहोचणार असून, आषाढी एकादशी 10 जुलैला आहे. सोहळ्यात तीन उभे रिंगण, चार गोल रिंगण होणार आहेत. तिथीची वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, पुणे, सासवड, फलटणमधे प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीतून 21 जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहील. 


तुकाराम महाराजांचा पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार


संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार असल्याची घोषणा देहू संस्थांनने केली. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा तुकाराम महाराजांची पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास करत तुकाराम महाराजांची पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर 10 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होईल. 


महत्वाच्या बातम्या: