मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र दौरा, मुंबईत मोदी-ठाकरे येणार एकाच मंचावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत 22 एकरच्या मैदानात सभा होईल. यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे.


पुण्यातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.


राहुल गांधींची आज सलग दुसऱ्या दिवशी ईडी चौकशी होणार
नॅशनल हेरॉल्ड केसप्रकरणी इडीकडून काल राहुल गांधींची सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली. रात्री 11.25 वाजता राहुल गांधी ईडी ऑफीसमधून बाहेर पडले. आजही राहुल गांधींची चौकशी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधींनी दिलेल्या उत्तरात अनेक चुका असल्यानं त्या दुरुस्त करण्यात वेळ गेला. त्यामुळे, राहुल गांधींना बाहेर यायला उशीर झाला.  


राज ठाकरेंचा 54 वा वा वाढदिवस, तब्येतीच्या कारणास्तव कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी नाहीत
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 54 वा वाढदिवस आहे. पण तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत.  माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही, असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 
-राज ठाकरेंच्या वाढदिवसानिम्मित मनसेतर्फे चेंबूरमध्ये सीएनजीच्या दरात ५४ टक्के सूट मिळणार आहे- प्रशांत
-औरंगाबाद- राज ठाकरेंच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना 54 रुपये प्रती लीटर दराने पेट्रोल देण्यात येणार आहे. प्रत्येकी 1 लीटर पेट्रोल या दरात दिले जाईल.
-औंरगाबाद- हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.


यूपीतील बुलडोझर कारवाईविरोधात जमीयत उलेमा ए हिंद सुप्रीम कोर्टात, कारवाई थांबवण्याची मागणी 
यूपीमध्ये दंगलीत सामील असणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात येतोय. याविरोधात जमीयत उलेमा ए हिंद कडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कायदेशीर बाबींशिवाय ही कारवाई होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय. तसेच, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. 


आज भारत वि. दक्षिण आफ्रिकेतील तिसरा टी-20 सामना
आज भारत वि. दक्षिण आफ्रिकेतील तिसरा टी-20 सामना असून मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा सामना विशाखापट्टणमला होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे, मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला हा तिसरा सामना जिंकणं आवश्यक आहे. 


नवाब मलिकांची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका सादर
आगामी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी याकरता नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली आहे. जुन्या याचिकेत सुधारणा करत नव्या मागण्या करण्याची परवानगी नाकारल्यानं नवी याचिका सादर करण्यात आली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी याकरता प्रयत्न सुरू आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या समोर आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करणार. 


अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन याचिकेवर आज सुनावणी
अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन अर्जाला सीबीआयनं विरोध केलाय. तपासयंत्रणेनं दाखल केलेलं आरोपपत्र अपूर्ण असल्याचा दावा अयोग्य असल्याचं सांगत देशमुखांच्या याचिकेला उत्तर देत सीबीआयनं आपलं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं. मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.


आज वटपोर्णिमा
महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.


वर्धा- अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य संस्थांच्या उपक्रमा अंतर्गत महिलांसह पुरुष देखील वटपौर्णिमा साजरी करणार आहेत आणि वडाचे झाड लावून निसर्ग रक्षणाचा संदेश देणार आहेत. 


सुशांत सिंह राजपूतची दुसरी पुण्यतिथी
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची 14 जूनला दुसरी पुण्यतिथी आहे. सुशांत आज या जगात नसला तरी त्याच्या आठवणी चाहते कधीच विसरू शकत नाहीत. सुशांत सिंह राजपूतने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे. सुशांत सिंह राजपूत लक्झरी लाईफ जगत होता.