Kirit Somaiya : आपल्यावरील हल्ल्यांची सीबीआय (CBI) मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. किरीट सोमय्यांनी खार पोलीस स्टेशनबाहेर झालेल्या हल्ला प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी बनावट आणि फेरफार करून दाखल केलेल्या एफआयआरची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा(सीबीआय)मार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. गुरूवारी दाखल झालेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठणाची घोषणा करून कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष लोकसभा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांना भेटून 23 एप्रिल रोजी सोमय्या खार पोलीस ठाण्याबाहेर पडत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर क्रूरपणे हल्ला केल्याचा दावा किरीट सोमय्यांनी या याचिकेतून केला आहे. या हल्ल्यानंतर एफआयआर दाखल करण्यासाठी सोमय्यांनी वांद्रे पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तेव्हा, आपला जबाब सविस्तरपणे घेऊन पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी नंतर आपण दिलेल्या तपशिलांमध्ये फेरफार करत आपल्या स्वाक्षरीशिवायच एफआयआर वेब साइटवर अपलोड केला. यावरून पोलीस शिवसेना कार्यकर्त्यांना पाठीशी घालून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही याचिकेतून केलेला आहे.
मुंबई पोलिसांचे हे कृत्य फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) तरतुदींचं घोर उल्लंघन असल्याचा आरोप सोमय्यांनी आपल्या याचिकेतून केला आहे. आपल्या जीवावर झालेल्या हल्ल्यांबाबत न्याय आणि निष्पक्ष चौकशीसाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित होणं आवश्यक असल्याचेही सोमय्यांनी याचिकेत म्हटलेलं आहे. तसेच वांद्रे पोलिसांनी दाखल केलेल्या या एफआयआरमध्ये आपल्यावरील हल्ला ही 'किरकोळ' घटना असल्याचा उल्लेख केला असून सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाच्या गुंडांचे संरक्षण करण्याच्या हेतूनेच एफआयआरमध्ये फेरफार करण्यात आला आहे. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात कागदपत्रे आणि वांद्रे तसेच खार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात यावीत. तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचीही न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे. बनावट आणि फेरफार करून गुन्हा दाखल करणाऱ्या आणि तपासासाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकार्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणीही सोमय्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Kirit Somaiya : किरीट सोमय्या-राज्यपालांची भेट; खोट्या FIR संदर्भात पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी
- Kirit Somaiya : पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का? खोट्या सहीनिशी एफआयआर दाखल केल्याचा सोमय्यांचा गंभीर आरोप
- सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात; संजय राऊतांचा टोला