मुंबई: येत्या 3 मे रोजी औरंगाबाद येथे मनसेची जाहीर सभा आयोजित केली असताना आता त्याच्या आधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आता नोटिस पाठवण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे चा अल्टिमेटम दिला असताना पोलिसांनी प्रिव्हेन्टिव्ह डिटेन्शन अॅक्ट अंतर्गत ही कारवाई सुरू केली आहे.


राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी 3 मे ची तारीख दिली आहे. त्यानंतर जर मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी औरंगाबाद या ठिकाणी जाहीर सभा घेण्याचं ठरवलं असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. 


एकीकडे 3 मेच्या अल्टिमेटम नंतर भोंगे जर उतरवले नाहीत तर काय करायचे या संबंधी मनसेकडून रणनीती आखली जात आहे तर दुसरीकडे यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक यादी बनवली असल्याची माहिती आहे. कलम 149 अंतर्गत आता काही कार्यकर्त्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे, तर काहींना यापुढे पाठवली जाणार आहे. कलम 153 आणि 153 (3) या अंतर्गत काही पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात घेतले जाणार आहे अशी माहिती आहे. त्यामुळे या यादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.


राज्याच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंच्या सभेनंतर काही समाजविघातक घटकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं आहे. 


पोलिसांनी बजावलेल्या या नोटीसीला मनसे कशा प्रकारे उत्तर देतंय याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.