पंढरपूर : पंढरपूर इथे धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणातील अनेकांची प्रकृती ढासळली असून पोलिसांनी बळजबरीने तिघांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवले आहे. तर इतर उपोषणकर्त्यांनी उपचारांसाठी नकार दिल्याने प्रकृती चिघळू लागली आहे. एकीकडे राज्यातील पूरस्थिती आणि दुसरीकडे आंदोलकांची प्रकृती खालावल्याने फडणवीस सरकारपुढे नवीन संकट उभं राहिलं आहे. दरम्यान या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयात सलग तारखा देऊन समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने राज्यातील 9 आंदोलकांनी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी यातील तीन आंदोलकांती प्रकृती खालावली. तर पाचव्या दिवशी चौघांची प्रकृती ढासळल्याने पोलिसांनी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केलं. यामुळे समाजात आता संताप वाढू लागला आहे.
सरकारच्या वतीने पालकमंत्री विजय देशमुख आणि शिवसेनेचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा करुन भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं होतं. सध्या सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे धनगर आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत. मात्र आता जसजसे पुराचे संकट कमी होऊ लागल्यावर पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप न केल्यास मात्र आंदोलकच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण, तिघांना रुग्णालयात हलवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2019 10:43 AM (IST)
मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयात सलग तारखा देऊन समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने राज्यातील 9 आंदोलकांनी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -