मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि पक्षाचे राज्यासह केंद्रातले प्रमुख नेते अजूनही शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निशाण्यावर आहेत. राऊत कधी इलेक्ट्रॅनिक माध्यमांसमोर तर कधी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. आज राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन भाजपवर टीका केली आहे.


नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदयादीवरुन (NRC) देशभरात मोठा गोंधळ सुरु आहे. तर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर करत आहेत. देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या या स्थितीवरुन राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.


राऊत यांनी ट्वीट केले आहे की, 'तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं' राऊत यांच्या या ट्वीटवरुन त्यांचा रोख मोद सरकारवर असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनी या ट्वीटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. वादळात होड्या आणि गर्वामुळे लोक बूडून जातात, संपून जातात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. परंतु मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या समसमान वाटपावरुन शिवसेना आणि भाजपचं बिनसलं. त्यानंतर भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर तीन दिवसांसाठी सरकार स्थापन केलं, परंतु हे सरकार टिकू शकलं नाही. त्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.


तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्तास्थापन केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यादरम्यानच्या काळात संजय राऊत यांनी सातत्याने भाजपला लक्ष्य केले. सत्तास्थापनेनंतर संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य करणे कमी केले होते. परंतु आज पुन्हा एकता संजय राऊत यांनी देशातल्या राजकीय परिस्थितीवरुन भाजपला लक्ष्य केले आहे.