मुंबई: महाविकास आघाडीची 23 ऑगस्टला मुंबईत बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात (Grand Hyatt) या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे, त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून 23 ऑगस्टच्या बैठकीमध्ये तयारी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे.
महाविकास आघाडीकडून इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी
येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपला पर्याय म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत आणि यासाठी विविध राज्यांत विरोधकांची आघाडी इंडियाची (INDIA) खलबतं सुरू आहेत. याआधी पाटणा आणि बंगळुरूमध्ये इंडिया (INDIA) आघाडीची बैठक झाली होती, तर आता तिसरी बैठक (Opposition Meeting) मुंबईत होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विरोधक असणाऱ्या महाविकास आघाडीने बैठकीची तयारी सुरू केली आहे.
मुंबईत होणाऱ्या बैठकीचं नेतृत्व ठाकरे गटाकडे
इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी ही शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष समन्वयाने बैठकीच्या आयोजनाच्या तयारीत लागले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी राष्ट्रवादीकडे
मुंबईत होणाऱ्या बैठकीला देशपातळीवरील विरोधी पक्षांचे नेते येणार आहेत. देशभरातील विरोधी पक्षात असलेले 26 पेक्षा अधिक पक्ष हे या बैठकीला हजर राहणार आहेत, यामध्ये देशातील पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश देखील असणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आली आहे.
नेत्यांच्या डिनरची जबाबदारी ठाकरे गटाकडे
31 ऑगस्टच्या रात्रीपासून भाजपविरोधी इंडिया आघाडीची बैठक सुरू होईल, यासाठी रात्री ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील सांताक्रूझ-कलिना परिसरातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांची डिनर डिप्लोमसी होईल.
नेत्यांच्या लंचची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विरोधी पक्ष आघाडी 'इंडिया'ची बैठक सुरू होईल. या दिवशीच्या नेत्यांच्या लंचची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आली आहे. 1 सप्टेंबरला काँग्रेस पक्षाकडून नेत्यांच्या लंचचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा: