Sanjay Raut Will Contest Lok Sabha Elections 2023: ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ईशान्य मुंबईतून (Northeast Mumbai) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2023) लढवणार असल्याची सध्या कुजबूज सुरू झाली आहे. पण यासंदर्भात बोलताना निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण सध्या संजय राऊत यांनी दिलं आहे. पक्षानं आदेश दिला तर मी निवडणूक लढवणार असल्याचंही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. 


सध्या ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. कोणत्या मतदार संघातून कोणता उमेदवार द्यायचा, याचा निर्णय महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत होणार आहे. मात्र ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी संजय राऊतांच्या नावाची कुजबुज सुरू होती. पण अद्याप याबाबत कोणाताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं राऊतांनी सांगितलं आहे. 


लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या व्यूहरचनेची जबाबदारी आणि सामनाची जबाबदारी असल्यानं संजय राऊत यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्या संदर्भात कुठलीही इच्छा व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, जर ईशान्य मुंबई लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊन पक्षाकडून आदेश आल्यास संजय राऊत निवडणूक लढवण्याबाबत विचार करणार असल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे.  


ईशान्य मुंबईतून संजय राऊतांनी निवडणूक लढवल्यास भाजपच्या मनोज कोटक यांच्या विरोधात ही निवडणूक त्यांना लढवावी लागणार आहे. दरम्यना, याआधी या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनोज कोटक विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय दीना पाटील यांनी निवडणूक लढवली होती. 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची कुजबुज : ABP Majha



शिंदे गटाचं आव्हान ठाकरे गट स्विकारणार? 


राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि पक्षात उभी फूट पडली. तेव्हापासून राज्याच्या राजकारणाला कटालणी मिळाली आहे. बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदार, खासदारांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच, उद्धव ठाकरेंनंतर सर्व शिंदे गटातील आमदार खासदारांच्या निशाण्यावर एकच व्यक्ती होती, ती म्हणजे, शिनसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत. 


शिंदे गटातील अनेक नेत्यांनी राऊतांवर टीकास्त्र डागली. राऊतांवर ईडीनंही कारवाई करत अटक केली. सध्या संजय राऊत जामीनावर बाहेर आहेत. अशातच शिंदे गटातील अनेकांनी संजय राऊतांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. आता संजय राऊतांनी आणि ठाकरे गटानं जणू शिंदे गटाचं आव्हान स्विकारल्या असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात होऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत आता ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची कुजबूज राजकारणात सुरू आहे.