जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधीत रुग्णांची झपाट्यानं होणारी वाढ पाहता हा कोरोनाचा समूह संसर्ग असल्याचा प्रकार असल्याची कबुली आरोग्य यंत्रणेने दिली आहे. कोरोनाच्या या संसर्ग लाटेमध्ये अनेक कुटुंबचे कुटुंब बाधित होत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ उडत असल्याचं तर काही रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.


कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता त्यावर उपचारासाठी किंवा नियंत्रणासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करीत असले तरी त्यात अद्याप पावेतो म्हणावं तसं यश मिळाले नसल्याने अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचार करून घेण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागत आहे. यामध्ये बेड मिळवणे, ऑक्सिजन मिळवणे, व्हेंटिलेटर मिळविणे यासारख्या गोष्टी आहेत.


गेल्या महिन्याभरापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पहायला मिळत आहे. या वाढीसाठी मागील दोन महिन्यात झालेल्या राजकीय सभा, मोठं मोठी गर्दी करून लावण्यात आलेले विवाह, घरच्या घरी विलगी करणात असलेल्या रुग्णांचा बेशिस्तपणा कारणीभूत असल्याचं, याचबरोबर आरोग्य यंत्रणा गाफील असल्याची कारणे आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.


कारण कोणतीही असली तरी कोरोना रुग्णांचा वाढता आकडा मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या यावर नियंत्रण मिळविणे प्रशासनाच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरले आहे. कारण सरकारी इस्पितळ आणि खासगी इस्पितळ ही केव्हाच फुल झाली असल्याने आता नव्याने येणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाला नव्या सुविधा कमी कालावधीत सुरू कराव्या लागणार आहे आणि त्यात अगोदरच कमी असलेलं मनुष्य बळ आणि अपूर्ण असलेल्या साधन सामग्री याचा ताळमेळ जुळविताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
 
वाढत्या रुग्ण संख्येवर उपाय म्हणून रुग्ण असलेल्या तालुका पातळीवरच उपचार होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी त्यात अनेक उणिवा असल्याने अनेक रुग्णांचा खासगी रुग्णालयकडे उपचारासाठी जाण्याचा कल आहे. मात्र, त्या ठिकाणी देखील अशीच कठीण परिस्थिती निर्माण झाल्याने काही खासगी रुग्णालयांनी अगदी रुग्णालयाच्या गच्चीवर रुग्णांची तातडीची व्यवस्था करून उपचार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रुग्णांना दिलासा मिळत असला तरी अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णालयाच्या धाब्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने दिला आहे.


वाढत्या रुग्ण संख्येचा फटका कोरोनाच्या चाचणी करण्यातही बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अचानक वाढलेली रुग्णसंख्या पाहता त्यांच्या चाचणीसाठी प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. चाचणी करण्यासाठी तपासणी शाळांची संख्या पुरेशी नाही, अशी अवस्था निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचे तपासणी अहवाल हे आठ आठ दिवसापर्यंत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने तो अहवाल येईपर्यंत संशयित रुग्ण गावभर फिरत असल्यानेही संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.