कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद, धर्मभेद मानायचा नाही हा विचार सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये रुजवला आहे. त्यात शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा इथला प्रत्येक नागरिक पुढे चालवत आहे. हिंदू मुलगा आणि मुस्लीम धर्माच्या मुलीने एकत्र येऊन लग्न केलं. एकाच मंडपात शुभमंगल सावधान आणि त्याच मंडपात कबुल...कबुल...कबुल पाहायला मिळालं.


कोल्हापूरच्या रंकाळा परिसरात राहणारे सत्यजित संजय यादव आणि मारशा नदीम मुजावर यांनी विवाह केला आहे. मुलगा हिंदू तर मुलगी मुस्लीम धर्माची आहे. दोघेही उच्चशिक्षित त्यामुळं आणि पुरोगामी विचारांचे आहेत. लहानपणापासूनच एकमेकांचे मित्र आणि पुढे आयुष्यभरासाठीचे जोडीदार झालेत.दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.कुटुंबांची परवानगी मिळावली आणि शाहू नगरीत धुमधडाक्यात लग्नाचा बार उडाला. एकाच मंडपात मंगलाष्टका आणि त्याच मंडपात निकाह कबुल झाला. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून एकमेकाला ओळखत असल्यानं कधीही धर्माचा अडसर आला नाही किंवा सामाजिक दबावाचा विचार कधी मनात आला नाही, असं सत्यजित यादव सांगतोय.


सत्यजित हा सिव्हिल इंजिनिअर आहे तर मारशा नदीम मुजावर ही आर्किटेक्ट आहे. 19 मार्चला एका हॉटेलमध्ये मौलानांच्या उपस्थिती मुस्लीम पद्धतीनं निकाह झाला. तर त्याच वेळी हिंदू पद्धतीने अक्षता, सप्तपदी विधी झाले. दोघांचेही कुटुंब पुरोगामी विचारांचे असल्यानं सामाजिक दबावाचा कुठलाच प्रकार घडला नाही. सुरुवातीला घरचे परवानगी देतील की नाही अशी भीती होती मात्र दोघांच्याही कुटुंबियांनी याला संमती दिली. दोन्ही कुटुंबातील मैत्रीचे संबंध आता नात्यात बदलले आहेत. आम्ही दोघे लहानपणापासून एकत्र वाढलो आहे. मात्र घरातील वडिलधाऱ्यांच्या परवानगीनेच लग्न करण्याचं ठरवलं होतं.


परवानगी मिळाली नाही तर पळून जाऊन लग्न करणार किंवा इतर विचार डोक्यात आले नाहीत. कारण आम्हाला खात्री होती की घरातील सर्व मंडळी आमच्या निर्णयाचं स्वागतच करतील, असे मारशा मुजावर म्हणाली. मुजावर कुटुंबीय ईदबरोबर दिवाळी, पाडवा आदी सण साजरे करतात. शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा असल्याचं ते सांगतात तर यादव कुटुंबीय देखील उच्च शिक्षित असून कोणाताही धर्मभेद त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मानला जात नाही. त्यामुळं शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या दोन्ही कुटुंबियांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे


मारशाचे आजोबा अस्लम मुजावर 1968 साली कोल्हापूर पालिकेत नगरसेवक होते. कुष्ठरुग्णांना शेंडापार्क येथे सुविधा मिळवून देण्यासाठी केलेल्या चिपको आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती.  माणुसकी हाच धर्म आम्ही मानतो. सर्व जाती धर्मांच्या लोकांचा आदर करण्याची शिकवण आम्हाला वडीलधाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं आम्ही केवळ मानवता हा एकच धर्म मानतो अशी प्रतिक्रिया मुलीचे वडील नदीम मुजावर यांनी दिली आहे.