जळगाव : महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. आता याचा फटका भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी आता राज्य सरकारकडे केली आहे.


एकनाथ खडसे यांना एक लाख चार हजार इतके बिल आले आहे. हे बिल एप्रिल ते जुलै असं चार महिन्यांचं आहे. घराचे वीजबिल एक लाख चार हजार इतके आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेले लाईट बिल पाहून खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणने बिल पाठवण्याअगोदर ती तपासून पाहायला हवीत. या बिलांमध्ये सवलत द्यायला हवी. सूट द्यायला हवी, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा-  शेतात वीज कनेक्शन नसतानाही महावितरणचं लाखांचं बिल

या बिलांची तपासणी करा, तसेच सूट द्या. महावितरणने ग्राहकांना विनाकारण वेठीस धरू नये अशी मागणी खडसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. महावितरणच्या वाढीव बिलाबाबत राज्यभरात अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

वीज जोडणी केली नसताना शेतकऱ्याला एक लाखाच्या जवळपास बिल

लॉकडाऊन सुरू असताना महावितरण कंपनी कडून वीज जोडणी केलेली नसताना नाशिक जिल्हयातील खामखेडा येथील शेतकऱ्याला तब्बल एक लाखाच्या जवळपास वीज बिल आले असल्याचे समोर आले होते. भाऊसाहेब अहिरराव यांची देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शेत जमीन असून आपल्या शेतातील विहिरीवर विज मिळावी म्हणून त्यांनी 2011 साली महावितरण आपल्यादरी या योजनेअंतर्गत चार हजार आठशे दहा रुपयांचे कोटेशन त्यांनी महावितरणच्या ठेंगोडे येथील कार्यालयात भरले. मात्र नऊ वर्ष उलटून सुद्धा त्याच्या शेतात ना विजेचे खांब उभे राहिले ना वीज तारा ओढल्या गेल्या ना त्यांना विज मिळाली,असे असतांना त्यांना महावितरणकडून लॉकडाऊनच्या काळात वीज वापरली म्हणून महावितरण कंपनीने एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाठवून एक प्रकारे शॉकच दिला होता.