नाशिक : लॉकडाऊन सुरू असतांना महावितरण कंपनी कडून विज जोडणी केलेली नसतांना नाशिक जिल्हयातील खामखेडा येथिल शेतक-याला तब्बल एक लाखाच्या जवळपास विज बिल आले आहे. भाऊसाहेब तानाजी आहिरराव या शेतक-याला महावितरण कंपनीने विजेचा शॉक दिलाय.

Continues below advertisement

भाऊसाहेब अहिरराव यांची देवळा तालूक्यातील खामखेडा शिवारात शेत जमीन असून आपल्या शेतातील विहिरीवर विज मिळावी म्हणून त्यांनी 2011 साली महावितरण आपल्यादरी या योजनेअंतर्गत चार हजार आठशे दहा रुपयांचे कोटेशन त्यांनी महावितरणच्या ठेंगोडे येथील कार्यालयात भरले. मात्र नऊ वर्ष उलटून सुद्धा त्याच्या शेतात ना विजेचे खांब उभे राहिले ना वीज तारा ओढल्या गेल्या ना त्यांना विज मिळाली,असे असतांना त्यांना महावितरणकडून लॉकडाऊनच्या काळात वीज वापरली म्हणून महावितरण कंपनीने एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाठवून एक प्रकारे शॉकच दिलाय. लाख रुपयाच्या जवळ पास आलेले बिल पाहून अहिरराव यांनी विज मंडळाच्या ऑफिसमध्ये धाव घेतली मात्र त्यांच कुठलेही म्हणणे ऐकून घेण्यात आल नाही. विज शेतात आलेली नसतांना आलेल बिल कसे भरणार असा प्रश्न त्यांच्या समोर पडलाय. महावितरण कंपनीकडे विचारणा केल्यानंतर सुध्दा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने येत्या 14 ऑगस्ट पासून महावितरण कार्यालयाजवळ उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

महावितरण आपल्या दारी या योजनेअंतर्गत बहुतेक शेतक-यांना विज जोडणी देण्यात आली. मात्र राज्यभरात कुठल्याही शेतक-याला विजेचे खांब आणि तारा देण्यात आल्या नाही. शेतक-यांना जवळच्या विद्युत खांबावरुन केबलद्वारे विद्युत जोडणी देण्यात आल्याच महावितरण कंपनीचे अधिकारी सांगत आहे. ज्या शेतक-यांची विज जोडणी झाली नसेल तर त्याची चौकशी करुन पंचनामा करण्यात येऊन त्यांचे विज बिलमाफ करुन कारवाई करण्यात येईल असा खुलासा महावितरण कंपनीच्या देवळा येथील उपकार्यकारी अभियंते राजेश हेकडे यांनी केलाय.

Continues below advertisement

राज्यभरात अहिराव यांच्यासारखे असे अनेक शेतकरी असतील ज्यांनी वीज जोडणीसाठी महावितरण आपल्या दारी या योजनेत पैसे भरुन त्यांना विज जोडणी मिळाली नसेल. परंतु वीज वितरण करणा-या कंपनीकडून कडून त्यांना बिल पाठवून मोठे धक्के मिळाले असेल.

एकीकडे मार्च, एप्रिल, मे महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेक दुकान,संस्था बंद असतांना त्यांना महावितरण कडून मोठ्या रकमेचे वीज बिल पाठविण्यात आली. तर दुसरी कडे घरगुती ग्राहकांना विज मीटरचे रिडींग न घेता जून महिन्यात मागील तीन महिन्याच सरासरी रिडींग घेत अंदाजे बिल पाठविण्यात आली. हाच प्रकार जुलै महिन्यात आलेल्या बिलांमध्ये पहावयास मिळत असल्याने महावितरण कंपनी विरोधात नागरीकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे.