Ravindra Waikar, Rajan Salvi : मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडली आणि दोन गटांत पक्ष विभागला गेला. एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट. शिंदे गटानं पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतलं आणि तेव्हापासूनच ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली. ठाकरेंसह त्यांच्यासोबतच्या आमदार, खासदारांवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अशातच एकीकडे आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय उद्या जाहीर केला जाणार आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आणि राजन साळवी (Rajan Salvi) या ठाकरेंच्या विश्वासू आमदारांच्या तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागला आहे.


रवींद्र वायकर (Ravindra Waikar)


ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरी सकाळपासून ईडीची रेड सुरू झाली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि निवासस्थान अशा एकूण चार ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा नोटीस धाडली होती. अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. 


ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्र मिळतात का? याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. 


प्रकरण नेमकं काय?


रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


राजन साळवी (Rajan Salvi)


ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या कुटुंबीयांची अलिबाग (Alibag) येथील एसीबी कार्यालयात (ACB Office) उद्या (10 जानेवारी 2023) चौकशी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर राहणार आहेत. तर, साळवी यांचे बंधू आणि पुतण्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. एसीबीसमोर ज्यावेळी साळवी यांचे कुटुंबीयांसोबत चौकशीला हजर राहणार आहेत. त्याचवेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवीही उपस्थित राहणार आहेत. याबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले की, भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. "उद्या माझी आणि माझ्या कुटुंबीयांची एसीबी चौकशी आहे. भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही", असं राजन विचारेंनी स्पष्ट केलं आहे. 


राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागानं काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं. तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं.